पश्चिम बंगालमधील नितीन मंडल हे कळमनुरी येथे सराफा कारागीर म्हणून काम करत होते. ते परत आपल्या मूळ गावी पश्चिम बंगालमध्ये गेले. तिथे एक ४५ वर्षीय व्यक्ती मराठीत बोलत असल्याचे त्यांना आढळून आले. नितीन मंडल यांनी त्यांना थोडी फार मराठी येत असल्यानं मराठी भाषिक व्यक्तीशी संवाद साधला. यावेळी त्या व्यक्तीनं त्यांचं नाव नंदकिशोर देशमुख असे सांगितले. इथून पुढं फेसबुकची गोष्ट सुरु होते.
निताई मंडल हे आणि हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे फेसबुक फ्रेंड आहेत. नितीन मंडल यांनी बापुराव घोंगडे यांना याबाबत माहिती दिली. घोंगडे यांनी त्यांच्याकडून संबंधित व्यक्तीचा व्हिडिओ मागवून घेतला. मंडल यांनी नंदकिशोर देशमुख यांचा व्हिडिओ घोंगडे यांना पाठवून दिला. बापुराव घोंगडे यांनी तो व्हिडिओ बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या मित्रांना पाठवला. अवघ्या तासाभरातच नंदकिशोर देशमुख यांच्या कुटुंबीयांचा पत्ता मिळाला. देशमुख यांच्या भावानं बापुराव घोंगडे यांना फोन केला आणि संबंधित व्यक्ती आपला भाऊ असल्याचं सांगितलं. यावर घोंगडे यांनी त्यांचा भाऊ १५०० किलोमीटरवर पश्चिम बंगालमध्ये असल्याचं सांगितलं.
बुलढाणा जिल्ह्यातील नंदकिशोर देशमुख अडीच वर्षापूर्वी घरातून निघून गेले होते. ते आता बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील सोनद या गावात पोहोचले आहेत. यापूर्वीही सोशल मीडियाच्या माध्यमातून घरापासून व कुटुंबीयापासून दुरावलेल्या व्यक्ती परत त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्या असल्याचे दिसून आले.