बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ

हायलाइट्स:

  • वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू
  • वनविभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ
  • बिबट्याच्या बछड्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा अंदाज

चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान निदर्शनास आली. एकाच वेळी बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृतदेह आढळल्याने वनविभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उपक्षेत्र/नियतक्षेत्र सिंदेवाहीमधील जाटलापूर गावाचे पांदन रस्त्यालगत बिबट्याचे हे बछडे मृत अवस्थेत आढळले. याबाबत माहिती प्राप्त होताच वनाधिकारी क्षेत्रीय कर्मचारी आणि बंडू धोतरे NTCA प्रतिनिधी तसेच ब्रम्हपुरी येथील मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेळकर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बिबट्यांच्या मृत बछड्यांच्या शवविच्छेदनासाठी डॉ. सुरपाम पशुवैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती सिंदेवाही, डॉ संतोष गवारे, पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही व डॉ पराग खोब्रागडे पशुधन विकास अधिकारी नवरगांव यांना पाचारण करण्यात आले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; FRP साठी राजू शेट्टींनी उचललं ‘हे’ पाऊल

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमुने बिबट्याच्या बछड्यांचे शवविच्छेदन केले असून मृतदेहावरील जखमा व आसपास वाघाच्या पाऊलखुणा बघून बिबट्याच्या बछड्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र शवविच्छेदन अहवालावरूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. शवविच्छेदनानंतर उपस्थित सर्व वनअधिकारी, कर्मचारी, NTCA चे प्रतिनिधी व मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी यांच्या समक्ष बिबटच्या बछड्यांचा मृत शरीराचे दहन करण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड, वाघोली बुटी,सामदा परिसरात दोन बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. तसेच व्याहाड येथील एका महिलेला बिबट्याने घरासमोरील अंगणातून उचलून नेले होते. बिबट्याच्या हल्ल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या बिबट्यांनी दोन वेगवेगळ्या हल्ल्यामध्ये दोघा जणांना जखमी केले होते. या घटनेमुळे गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला होते. त्यानंतर २६ जुलैला मादी जातीच्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले वाढले असतानाच बुधवारी सकाळी दोन बिबट्यांच्या बछड्यांचा मृतदेह आढळल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी शवविच्छेदनाचा अहवाल काय येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Source link

chandrapur newsleopardचंद्रपूरबिबट्यावनविभाग
Comments (0)
Add Comment