देशातील एकमेव असे दुसऱ्या मजल्यावरील मातृलिंग मंदिर
साडे तीन शक्तिपीठांपैकी एक पीठ अशी करवीर निवासिनी आई अंबाबाईची ओळख आहे. चालुक्यांच्या काळातील इ. स. ७००च्या आसपास म्हणजेच सुमारे १२०० वर्षांपूर्वीचे हे अतिप्राचीन मंदिर. मंदिराची बांधणीही एका विशिष्ट स्वरूपात केली आहे. हे मंदिर तीन वेगवेगळ्या भागात असले तरी मंदिर पाहताना एकत्रच वाटतात. मंदिरात अनेक छोटी छोटी मंदिरं देखील आहेत. यातील काही मंदिरं वर्षातून ठराविक वेळीच उघडली जातात. मंदिराच्या बांधणी आणि रचनेत अनेक वैशिष्ट्य आढळतात. अनेक वैशिष्ट्यांपैकी महत्त्वाचं म्हणजे मातृलिंग मंदिर. अनेकांना हे मातृलिंग मंदिर कुठे आहे ते माहिती नाही. तर अनेकांना त्याबद्दल माहितीच नाही. वर्षांतून केवळ ३ वेळा श्रावणी सोमवार, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री आणि दररोज साडे बारा वाजता आरती होत असते. त्या आरतीवेळी काही काळासाठी या मंदिराचा दरवाजा उघडला जातो.
अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत रचनेत दोन मजले करण्यात आले आहेत. खाली गाभाऱ्यात करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती असून तिच्या डोक्यावरच म्हणजेच वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे. खाली कासव चौक आणि गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती आहे. त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर नंदी आणि गर्भगृहात मातृलिंग आणि चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती आहे. याच मंदिरावर मुख्य शिखर आहे. या मंदिरात जाण्यासाठी चिंचोळ्या गुप्त पायऱ्या आहेत. पण वर्षातील केवळ मोजक्या दिवशी हे मंदिर दर्शनासाठी उघडले जाते. देशामध्ये कुठेही असे दुमजली मंदिर नाही. अंबाबाई मंदिर हे एकमेव उदाहरण असल्याचे सांगितले जाते. अंबाबाईच्या मूर्तीच्या शेजारी ज्या पद्धतीने तीन वेगवेगळ्या खोल्या आहेत त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर सुद्धा छोट्या छोट्या तीन खोल्या आढळतात. त्याला ‘ध्यान गृह’ असेही म्हटले जाते. मंदिराच्या याच रचना आणि बांधणीमुळे मंदिराला आणखी विशेष बनवते.
वर्षातून केवळ ३ वेळा मंदिराचे दरवाजे उघडतात
मातृलिंग मंदिरात भक्तांना दररोज दर्शनासाठी प्रवेश नाहीये. मात्र, वर्षातून ३ वेळा मंदिर उघडले जाते. श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारी, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री आणि दररोज साडे बारा वाजता आरती होत असते. त्या आरतीवेळी काही काळासाठी दरवाजा उघडला जातो. श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारी, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री या तिन्ही वेळा सर्व भक्तांसाठी मातृलिंग मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते.