पतीने पत्नी, मेव्हणी आणि सासूला केलेल्या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शहरातील मुकुंदवाडी भागात घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीराम हरिभाऊ वाडेकर असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर त्याची पत्नी सोनी बळीराम वाडेकर (वय -२३ वर्षे), सासू – कडूबाई गायकवाड, आणि मेव्हणी अशा सोमनाथ इंगळे अशी तिन्ही जखमी महिलांची नावे आहेत. तिन्ही जखमी महिलांवर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
या प्रकरणी जखमी कडूबाई गायकवाड व पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. आरोपी बळीराम हा कडूबाई यांचा जावई आहे. मात्र बळीरामच्या बाहेरख्यालीपणामुळे मुलगी आणि जावईमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा वाद झाला होता. त्यामुळे मुलगी सोनी ही माहेरी आईकडे मुकुंदवाडीत राहायला आली होती. तिने पती विरोधात पोलिसात तक्रारही केली होती. दरम्यान, १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी त्याला महिलेसोबत बोलण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे पुन्हा वाद झाला.
आरोपी बळीराम संतापला होता. त्याने थेट सासरवाडी गाठली. माझ्या विरोधात पोलिसात तक्रार देता का? आता सर्वांना बघतो, अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने पत्नी, सासू आणि मेव्हणीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मेव्हणी अशा इंगळे हिच्या डाव्या हाताचे हाड मोडले. तसेच पायचे हाडही मोडले. आता तिन्ही जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बळीराम याची पत्नी सोनी वाडेकर यांच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीवर कारवाई करण्याची मागणी, सासू गायकवाड यांनी केली आहे. पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करीत आहेत.