राज्यात लवकरच ३० हजारांहून अधिक शिक्षकांची आणि केंद्रप्रमुखांची पदे भरली जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणाला आकार देण्याचे काम समांतर सुरू आहे. त्यामुळे शाळाबाह्य मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी नमूद केले.
राज्य राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘पुढील काळात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असून, पेन्शनसारखा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. तो सोडवण्यासाठी येत्या काळात उपमुख्यमंत्र्यांच्या समन्वयातून चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतो त्यामुळे शिक्षकांवर कुठल्याही प्रकारचे बंधने टाकणार नाहीत. शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे; तसेच विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे’
आताच्या स्पर्धात्मक युगात आपण पुढे गेलो पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरील शिक्षणावर भर दिला जाईल व केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण भविष्यकाळातील सुवर्णसंधी असल्याचेही त्यांनी सांगितले. या अधिवेशनाचे प्रस्थाविक राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य अध्यक्ष उदय शिंदे यांनी केले.