हायलाइट्स:
- ३१ लाखांचा गांजा ट्रकमध्ये अशा ठिकाणी लपवला की पोलीस हैराण
- आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात येत पोहचला होता ३१ लाखांचा गांजा
- ‘ही’ एक चुक पडली महागात
अमरावती : आंध्रप्रदेशातून अमरावतीत मोठ्या प्रमाणात गांजा जाणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारेच तळेगावचे ठाणेदार अजय आकरे त्यांच्या पथकासह यवतमाळ जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या देवगाव ते बाभुळगाव मार्गावर नाकाबंदी करून या ट्रकच्या मार्गावर होते.
आंध्रप्रदेशातून अमरावतीत विक्रीसाठी येत असलेला तब्बल ३१ लाख ३९ हजार रुपयांचा गांजा तळेगाव दशासर पोलिस व एलसीबीने पकडला केला आहे. ही कारवाई मंगळवारी देवगाव ते बाभुळगाव मार्गावर करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी गांजा व ट्रकसह एकूण ४१ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून, गांजा अमरावतीत कोणासाठी येत होता, त्या मुख्य सूत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत.
यापूर्वीही अनेकदा पोलिसांनी पकडलेला गांजा हा आंध्रप्रदेशातूनच अमरावतीत येत असल्याचे पुढे आले आहे. आजसुध्दा ज्या ट्रकमध्ये गांजा आला, त्या ट्रकमध्ये वरुन पाहीले असता ट्रक रिकामा दिसत होता. मात्र रिकाम्या ट्रकमध्ये ताडपत्री घडी न करता चोळामोळा करुन टाकून दिली होती. त्यामुळे त्या ताडपत्रीखाली काही असावे, असे चुकूनही वाटत नाही. मात्र पोलिसांनी मागच्यावेळीसुद्धा अशाच पद्धतीने गांजा पकडला होता. म्हणून पोलिसांनी आज ट्रकमध्ये जावून ताडपत्री उचलून पाहीली असता त्याखाली मोठ्या प्रमाणात गांजा मिळून आला आहे.
या प्रकरणात पोलीसांनी शेख हसन शेख कासम (४८, अमरावती) नामक आरोपींना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्यात शेख हसन पसार होता. मंगळवारी सकाळपासूनच पोलिसांना आंध्रप्रदेशातून अमरावतीत मोठ्या प्रमाणात गांजा जाणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारेच तळेगावचे ठाणेदार अजय आकरे त्यांच्या पथकासह यवतमाळ जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या देवगाव ते बाभुळगाव मार्गावर नाकाबंदी करुन या ट्रकच्या मागावर होते.
दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक ट्रक (क्र. एम. एच. २७ एक्स ०१५६) नकाबंदीमध्ये आला. त्यावेळी पोलिसांनी ट्रकमध्ये काय आहे, असे चालकाला विचारले असता ट्रक रिकामा आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी स्वत: ट्रकमध्ये पाहिले असता प्रथमदर्शनी ट्रक पूर्णत: रिकामा असल्याचे दिसले. मात्र, पोलिसांनी ज्यावेळी ताडपत्री खाली पाहिले असता मोठ्या प्रमाणात गांजाचे पॅकेट दिसले. त्यामुळे पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेऊन ठाण्यात आणला. त्यावेळी ट्रकमधून तब्बल २ क्विंटल ६१ किलो गांजा निघाला.
या गांजाची किंमत तब्बल ३१ लाख ३९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या गांजासोबतच १० लाख रुपये किंमत असलेला ट्रक असा एकूण ४१ लाख ३९ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. हा गांजा अमरावतीत चिल्लर विक्रीसाठी जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. मात्र, अमरावतीत याचा मुख्य सूत्रधार कोण आहे. याचा पोलीस तपास करत आहे.