या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. महाशिवरात्रीदिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निशीथकालात यशाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात. पहिल्या प्रहरात ‘श्रीशिवाय नमः’ असा नामोच्चार करावा. दुसऱ्या प्रहरात ‘श्रीशंकराय नमः’ असे म्हणावे. निशीथकाली ‘श्रीसांबसदाशिवाय नमः’ असे जपावे. तिसऱ्या प्रहरात ‘श्रीमहेश्वराय नमः’ आणि चौथ्या प्रहरात ‘श्रीरुद्राय नमः’ असा नामोच्चार करून समर्पण करावे. तसेच शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. यानंतर गंध, अक्षता, फुले वहावित. नैवेद्य दाखवून शंकराचे नामस्मरण करावे.
घरी अशी करा पूजा
घरी महादेवाची पिंड किंवा प्रतिमा असेल तर चौरंगावर विधीवत ठेऊन पूजा मांडावी. पिंड किंवा प्रतिमा नसेल तर वाळूची पिंड मांडून पूजा करावी. पहाटे स्नान करून पूजा करावी. या पूजेला देवाला अभ्यंगस्नान घालावे. बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर वाहाव्यात. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृतानी स्नान घालावे. ऊॅं नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे. शिवपूजेत हळद-कुंकू न वापरता भस्म वापरावा, तर शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. नैवेद्य दाखवावा आणि निरांजन ओवाळावं आणि आरती करावी.
असा घ्यावा व्रत संकल्प
महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र झाल्यानंतर कपाळावर भस्माचा त्रिपुंड टिळा लावावा आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. त्यानंतर मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करवी. व्रत संकल्प घेताना खालील मंत्राचा उच्चार करावा –
शिवरात्रिव्रतं ह्येतत् करिष्येहं महाफलम्।
निर्विघ्नमस्तु मे चात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते।।
त्यानंतर हातामध्ये फुल, अक्षता घेऊन शिवलिंगावर अर्पित करताना खालील मंत्राचा उच्चार करावा.
देवदेव महादेव नीलकण्ठ नमोस्तु ते।
कर्तुमिच्छाम्यहं देव शिवरात्रिव्रतं तव।।
तव प्रसादाद्देवेश निर्विघ्नेन भवेदिति।
कामाद्या: शत्रवो मां वै पीडां कुर्वन्तु नैव हि।।
अशाप्रकारे महादेवाची रात्री करा पूजा
दिवभर शिव मंत्र (ऊं नम: शिवाय)चा जप करून निराहार उपवास करावा (रोगी, अशक्त आणि वृद्ध दिवस फलाहार) करू शकतात. शिवपुराणामध्ये रात्रीच्या चार प्रहरात शिव पूजा करण्याचे विधान आहे. संध्याकाळी स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून बसावे आणि खालील मंत्राचा उच्चार करून संकल्प घ्यावा.
ममाखिलपापक्षयपूर्वकसलाभीष्टसिद्धये शिवप्रीत्यर्थं च शिवपूजनमहं करिष्ये
महादेवाला फळ, फूल, चंदन, बिल्वपत्र, धोतरा अर्पण करून, धूप-दीप लावून रात्री चारही प्रहर पूजा करावी. जल आणि पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावा. भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र, महान, भीम आणि ईशान या नावांचा उच्चार करून फुल अर्पण करावे. त्यानंतर आरती करावी. खालील मंत्राचा उच्चार करून प्रार्थना करावी –
नियमो यो महादेव कृतश्चैव त्वदाज्ञया।
विसृत्यते मया स्वामिन् व्रतं जातमनुत्तमम्।।
व्रतेनानेन देवेश यथाशक्तिकृतेन च।
संतुष्टो भव शर्वाद्य कृपां कुरु ममोपरि।।
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा स्नान करून महादेवाची पूजा करून व्रत सोडावे.
महाशिवरात्रीची कथा
असे सांगितले जाते की, सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव आणि पालनहार श्रीविष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून जोरदार वाद झाला. दोघांचे भांडण सुरू असताना, त्यांच्यासमोर एक महाकाय अग्निस्तंभ प्रकटला. या अग्निस्तंभाचे तेज पाहून दोघे जण स्तिमित झाले. प्रकटलेल्या अग्निस्तंभाचा शोध घेण्यासाठी विष्णू देवांनी वराह रुप, तर ब्रह्मदेवांनी हंसाचे रुप धारण केले. काही केल्या या दोघांचा त्याचा आदि-अंत समजेना. अखेर त्या अग्निस्तंभातून शिवशंकर प्रकट झाले. शिवतत्त्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जाऊ लागला.