मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या ४७७ इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी ५०पेक्षा अधिक इमारतींचे सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. तसेच आगीपासून बचाव करण्यासाठी नवीन फायर स्प्रेही बसवण्यात येणार आहेत. सध्या पालिकेच्या एकाही शाळेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा नाही. ही कमतरता लवकरच भरून काढण्यात येणार आहे.
सध्या मुंबई पालिका शाळांमधील प्रथमिक आणि माध्यमिक वर्गांमध्ये एकूण तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिकतात. तर साडेसात हजारांपेक्षा जास्त शिक्षक आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी सध्या यंत्रणा नाही. सीसीटीव्ही बसविल्यास शाळा किंवा हद्दीतील एखादी घटना, प्रसंग किंवा गुन्हा त्यामध्ये कैद होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तरतूद केली जात आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी एलईडी स्क्रीन बसवण्यात येतील. त्याआधारे मुख्याध्यापकांना आपल्या शाळेतील घडामोडींवर लक्ष ठेवता येईल, असे पालिकेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. प्रत्येक इमारतीत गरजेनुसार कॅमेरे बसवण्यात येणार असून, मार्च, २०२४पर्यंत ४७७ इमारतींत ते बसवण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पालिका शाळांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत आगीपासून संरक्षण करण्यासाठी शाळेतील पारंपरिक अग्निरोधक यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. यासाठी आग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पहिल्या टप्प्यात शालेय इमारतीतील विज्ञान प्रयोगशाळा, वाचनालय, मुख्याध्यापक खोली आणि शालेय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एक याप्रमाणे फाय़र स्प्रे बसवण्यात येतील. ४७७ शालेय इमारतींपैकी सुरुवातीस ३९१ इमारतींमध्ये ३,६५४ फायर स्प्रे बसवले जातील. ही अग्निरोधक यंत्रणा वजनाने हलकी असून, नववी, दहावीचे विद्यार्थीही सहजरित्या ती हाताळू शकणार आहेत.
– शाळेचे प्रवेशद्वार
– प्रसाधनगृहाबाहेर
– खोल्यांबाहेरील मोकळी जागा
– मुख्याध्यापकांच्या कार्यालयात एलईडी स्क्रीन
येथे असेल अग्निरोधक यंत्रणा
– विज्ञान प्रयोगशाळा
– वाचनालय
– मुख्याध्यापक खोली
– प्रत्येक मजल्यावरही एक
– ३९१ इमारतींमध्ये ३,६५४ फायर स्प्रे