सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करून पूर्ववत लागू करणे, सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, अशा मागण्या करत शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. बीड जिल्ह्यात या आंदोलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे येथी शिक्षकेतर कर्मचारी सांगतात.
वारंवार मागण्या करुनही त्याची पूर्तता न झाल्याने शिक्षकेत्तर कर्माचाऱ्यांनी बारावी परीक्षांदरम्यान संपाचे अस्त्र उगारले आहे. अकरा विद्यापीठ आणि बाराशे कॉलेज मधील एक शिक्षकेतर कर्मचारी संपावर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बसले आहेत. बारावीच्या परीक्षेतील पहिला पेपर असल्याने आज विद्यार्थी संभ्रम अवस्थेत आहेत. या सर्वाचा परिक्षेवर कसा परिणाम होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार हे मात्र निश्चित मानले जात आहे. कारण शिक्षकेतर कर्मचारी हे सगळे संपावर असल्याने परीक्षा नेमक्या कशा होणार? हा प्रश्न देखील विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय. आता विद्यार्थ्यांनीच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विनंती केली आहे.
शिक्षकांच्या संपाचा आज पहिला दिवस असून हा संप बेमुदत असल्याचं शिक्षकेतर कर्मचारी सांगत आहेत. जर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन देखील करणार असल्याची भूमिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.