HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला आज, मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. नागपूर विभागात एकूण एक लाख ५५ हजार ९१३ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या एका महिन्याच्या कालावधीत ही परीक्षा घेण्यात येते आहे.
विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि आयटीआय या शाखांचे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये, सर्वाधिक ७६,१०२ विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे आहेत. परीक्षार्थ्यांत ७९,३३२ विद्यार्थी, ७६,५७१ विद्यार्थिनी आणि १० तृतीयपंथीयांचा समावेश आहे. नागपूर विभागातील एकूण ४८४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल.
मंगळवारी सकाळी ११ ते २ आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.
अखेरच्या दिवसापर्यंत स्वीकारले अर्ज
फेब्रुवारी-मार्च २०२३च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन स्वीकारण्यात आली आहेत. सरल डाटाच्या आधारे ज्युनियर कॉलेजांची माहिती घेऊन ऑनलाइन अर्ज भरण्यात आले आहेत. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.
राज्यस्तरावर नेमले दहा समुपदेशक
परीक्षार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हानिहाय प्रत्येकी दोन समुपदेशक नेमण्यात आले आहेत. राज्यमंडळ व नऊ विभागीय मंडळांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यरत करीत हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर विभागासाठी ०७१२-२५६५४०३, ०७१२- २५५३५०७ आणि ०७१२-२५५३५०३ हे क्रमांक समुपदेशनाकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत.