म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ
मुकुटबन येथील मातोश्री पुनकाबाई कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरू होताच व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी झरी पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी मोहम्मद याकूब यांच्या तक्रारीवरून पर्यवेक्षक प्रेमेंद्र येलमावार, केंद्रप्रमुख अनिल दुर्लावार व एका अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाइल घेऊन येण्यास बंदी केली आहे. मुकुटबन येथील मातोश्री पुनकाबाई कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर मंगळवारी सकाळी ११ वाजता परीक्षार्थ्यांना इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आली. काही क्षणातच या प्रश्नपत्रिकेचे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल झाले.
काही जागृत पालकाच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी याशनी नटराजन, झरीचे तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांना कळविले. माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी मोहम्मद याकूब हे पथकासह केंद्रावर आले. या केंद्रावर २१५ विद्यार्थ्यांपैकी २११ विद्यार्थी हजर असल्याचे दिसले. पोलिसांनी संशयिताला हुडकून काढले व बयान घेतले. त्यानंतर मुकुटबन पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले.