आता ही संधी सोडू नका, मिरा-भाईंदरमध्ये पालिकेत बंपर भरती, जाणून घ्या तपशील

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर

मिरा-भाईंदर महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास राज्य सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. पालिकेने ३३९ महत्त्वाची पदे भरण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. या प्रस्तावाल आस्थापना खर्चाची अट शिथिल करत नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत भरतीसाठीची आवश्यक प्रक्रिया प्रशासनाकडून पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.

मिरा-भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागातील काही पदे भरण्यासाठी २०१५ साली शेवटची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर आस्थापना खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मागील सात वर्षांत कोणत्याही पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. परिणामी, मागच्या अनेक वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याने कंत्राटी किंवा ठोक मानधनावर काही जागा भरण्यात आल्या आहेत.

मिरा-भाईंदर पालिकेचा सुधारित आकृतीबंध २०१९ साली मंजूर झाला आहे. त्यानुसार सुमारे तीन हजार ८०० पदे मंजूर असून त्यापैकी एक हजार ३०० हून अधिक पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने महापालिकांना रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अ, ब आणि क या गटातील महत्त्वाची ३३९ पदे भरण्यासाठीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने राज्य सरकारला गेल्या महिन्यात सादर केला होता. त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी देताना आस्थापना खर्चाची ३५ टक्क्यांची अट सरकारकडून शिथिल करण्यात आली आहे.

ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड) व आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) यातील एका संस्थेची निवड करण्याचे आदेश सरकारकडून पालिकेला देण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद आहे. त्यामुळे बिंदू नियमावली तपासून जाहिरात प्रसिद्ध करत, येत्या सहा महिन्यांत भरती करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

या पदांकरता भरती

मिरा-भाईंदर महापालिकेने बारवी धरणाच्या काही प्रकल्पग्रस्तांना शासन आदेशानुसार नुकतेच सेवेत सामावून घेतले आहे. आगामी काळातदेखील काहींना सामावून घेतले जाणार आहे. यासह सफाई, वाहनचालक व इतर कामांसाठी कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे ड वर्ग वगळता इतर गटातील पदे भरली जाणार आहेत. यात प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, अग्निशमन कर्मचारी, डेपो मॅनेजर, सहायक आयुक्त, डायलिसिस तंत्रज्ञ व इतर पदांचा समावेश आहे.

Source link

Drug Manufacturing Officer JobGynaecology & Obstetrics JobJob opportunitiesMedical Officer JobMira Bhyander JobMira Bhyander Job DetailsMira Bhyander Municipal Corporation jobMira Bhyander RecruitmentMira Bhyander Recruitment DetailsObstetrician Jobrecruitment processनोकरीमिरा-भाईंदर महापालिकेत नोकरी
Comments (0)
Add Comment