PMC Job 2023: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, महापालिकेत पुन्हा नोकरभरती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेमध्ये नुकतीच ४४८ जागांची भरती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली असून, त्यापाठोपाठ ३४० जागांसाठीची पुढील भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर केला आहे. अग्निशामक दल (२००), निवासी वैद्यकीय अधिकारी (२०), आरोग्य निरीक्षक (४०) या पदांसह आरोग्य विभाग, वाहन विभागातील मिळून ३४० जागांची भरती करण्यात येणार आहे. राज्यात सध्या नोकरभरती करणारी पुणे ही एकमेव महापालिका ठरली आहे.

अनेक वर्षांनंतर प्रक्रिया

पुणे महापालिकेत अनेक वर्षांहून अधिक काळ पदभरती झाली नव्हती. अपुऱ्या मनुष्यबळावर कारभार सुरू असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढले असून, त्यावरील खर्चही वाढला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कायम सेवा भरतीवरील बंदी उठविल्याने अत्यावश्यक पदभरती पहिल्या टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तो यशस्वीरीत्या झाला. यात, पुणे महापालिकेने बऱ्याच वर्षांनी ४४८ पदांची भरती केली.

त्यानंतर आता विविध पदांसाठी ३४० जणांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन परीक्षा होणार असून, सामान्य ज्ञान, इंग्रजी, मराठी व बुद्धिमता चाचणी या विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी उत्तरे असणारी प्रश्‍नपत्रिका राहणार आहे.

या पदांची होणार भरती

क्ष-किरण तज्ज्ञ (८), वैद्यकीय अधिकारी (२०), उपसंचालक, प्राणिसंग्रहालय (१), पशुवैद्यकीय अधिकारी (२), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (२०), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१०), आरोग्य निरीक्षक (४०), वाहन निरीक्षक (३), औषध निर्माता (१५), पशुधन पर्यवेक्षक (१), अग्निशामक दल, फायरमन (२००).

वादाशिवाय प्रक्रिया पूर्ण

महापालिकेने २० जुलैपासून ४४८ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यामध्ये सहायक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण निरीक्षक या पदांसाठी ही भरतीची करण्यात आली. भरतीची प्रक्रिया पारदर्शी असावी, यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (आयबीपीएस) या संस्थेद्वारे परीक्षा घेण्यासाठी करार करण्यात आला होता. कुठल्याही आरोप-प्रत्यारोपाविना भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. राज्यात यशस्वीरीत्या भरती प्रक्रिया पार पाडणारी पुणे ही महापालिका ठरली आहे. नव्याने होणारी भरती प्रक्रिया याच संस्थेकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी भरती प्रक्रियेची माहिती महापालिकेच्या https://www.pmc.gov.in/en/recruitments या लिंकवर उपलब्ध होणार आहे.

‘केडर’मध्ये वाढ होणार

महानगरपालिकेत ३४ गावांचा समावेश झाल्यामुळे इंजिनीअरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे महापालिकेच्या इंजिनीअर केडरच्या मंजूर झालेल्या मनुष्यबळामध्ये २५ ते ३० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली. त्यामुळे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता; तसेच कार्यकारी अभियंत्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. कार्यकारी अभियंत्यांची पदे भरण्यास परवानगी दिली, तर वरिष्ठ पदांसाठीही तातडीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आता ही संधी सोडू नका, मिरा-भाईंदरमध्ये पालिकेत बंपर भरती, जाणून घ्या तपशील
Agniveer Job: मुंबईसह आठ जिल्ह्यांत अग्निवीर भरती

Source link

laboratory vacancyMedical Field vacancyPMC Recruitmentpmc recruitment 2023Pune Jobpune job 2023Pune Municipal CorporationPune RecruitmentPune Vacancytechnician post vacantपुणे पालिकेत भरती
Comments (0)
Add Comment