बारावीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका हाती आली. हिंदी विषयाच्या या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचे देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा?असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. बोर्डाकडून बरेच दिवस आधीपासून बारावी परीक्षांची तयारी सुरु होते. असे असताना या चुका वारंवार का होतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. या शब्दांचे क्रमांक १,२,३,४ असे असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र १,२,१,२ असे क्रमांक देण्यात आले. एवढंच नव्हे तर समानार्थी शब्द लिहिण्यासाठी प्रश्नामध्ये देखील घोळ पाहायला मिळाला. येथे दिलेल्या चारही शब्दांना देखील १,२,३,४ असे प्रश्न क्रमांक अपेक्षित असताना त्याऐवजी १,१,१,१ हे प्रश्न क्रमांक देण्यात आले होते.
जीपीएस ट्रॅकिंग
परीक्षेतील प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वितरणाचे जीपीएस ट्रॅकिंग होत आहे. सहायक परिरक्षकावर त्याची जबाबदारी असणार आहे. याद्वारे परिरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका केव्हा स्वीकारली, परीक्षा केंद्रांवर केव्हा प्रश्नपत्रिका पोहचल्या याचे ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा कक्षात प्रश्नपत्रिकांचे पाकिट दिल्यानंतरही छायाचित्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दहा मिनिटांचा वेळ अधिक
यंदापासून १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने रद्द केला आहे. यासह मंडळाने निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिक कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे अगोदर दिल्या जात होते. यंदापासून नियमात बदल करून ही सुविधा रद्द करण्यात आली. निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा कालावधी विद्यार्थ्यांना वाढवून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहण्यास १० मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे.