समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे महाराज

गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगांव येथे झाला. गाडगे महाराज यांचे बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे, आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले. महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवून अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा असलेल्या आपल्या समाजापुढे आपल्या श्रमांचा आदर्श ठेवला.

गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात काढली. या काळात गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली. लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले.

लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार, प्रसार केला. गाडगे महाराजांना संतांचे अभंग तोंडपाठ होते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत.

गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. त्यांचे उपदेशही साधे व सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका, असे ते नेहमी सांगत असत. देव दगडात नसून तो माणसांत आहे, हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. गाडगे महाराज संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा, प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा उपयोग करत असत. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या.

तांब्याची अंगठी घालण्याचे ‘हे’ आहेत फायदे

गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे अनेक धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामे केली. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले. गाडगे महाराज समतेचे पुरस्कर्ते होते. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप अपार कार्य आणि कष्ट केले. अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला.

Source link

birth anniversaryimportance of cleanlinesssant gadge maharajsant gadge maharaj jayantiगाडगे महाराजगाडगेबाबासंत गाडगे महाराजसंत गाडगे महाराज जयंती
Comments (0)
Add Comment