शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी अर्थात ‘टेट’ या पात्रता परीक्षेने ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना जणू घाम फोडला. अपवाद वगळता बहुतांश विद्यार्थ्यांनी २० ते ३० टक्के प्रश्न सोडविलेलेच नसल्याची माहिती पुढे आली असून, ही परीक्षा किचकट प्रश्नांमुळे अवघड गेल्याची माहिती परीक्षार्थींनी ‘मटा’शी बोलताना दिली.
राज्यातील शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेचे आयोजन केले जाणार असून, त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता य बुद्धिमत्ता चाचणी (टेट) घेतली जाते. २२ ते ३० फेब्रुवारीदरम्यान या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील सहा केंद्रांवर ही कम्प्युटर बेस्ड् टेस्ट पार पडली.
काय म्हणाले विद्यार्थी?
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर अतिशय अवघड गेल्याची प्रतिक्रिया ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमधून उमटली. २०० गुणांच्या पेपरसाठी १२० मिनिटांची मिळालेला अवधी अत्यंत अपुरा असल्याचे या परीक्षार्थींनी सांगितले. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांवर या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न समजावून घेऊन सोडविण्यासाठीच वेळ अपुरा पडल्याचे मत परीक्षार्थींनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे किचकट भाषेत प्रश्न विचारल्यामुळे ते समजण्यात अधिक कालावधी गेल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
शिक्षणत्रोत्राचे लक्ष लागून
राज्यभरातील अडीच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून, ‘आयबीपीएस’ या संस्थेकडे संबंधित परीक्षेचे कंत्राट दिल्याची महिती राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली. ‘टीईटी’ परीक्षेत गैरमार्गाने प्रमाणपत्रे मिळविल्याचा प्रकार गेल्या वर्षी पुढे आला होता. त्यामध्ये परीक्षा परिषदेतील अनेक अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले होते. त्यामुळे या परीक्षेकडे शिक्षण क्षेत्राचे विशेष लक्ष लागून आहे.
मी २०१७ सालीही ‘टेट’ दिली होती. त्यावेळी २०० पैकी ११० गुण मिळाले होते. पेपर सोडवायला दोन तासांचा अवधी पुरला होता. परंतु, यंदा मात्र प्रश्न विचारण्याची पद्धत अधिक किचकट होती. त्यामुळे माझ्याप्रमाणे अनेकांना ही परीक्षा अवघड गेली. ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक प्रश्न सोडविणे शक्य झाले नाही.
– उदय भडांगे, परीक्षार्थी