मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या एलएलबी आणि बीएलएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेला ७५ दिवस उलटल्यानंतरही अद्याप निकाल लागलेला नाही. विधीच्या अनेक महाविद्यालयांनी परीक्षेला अडीच महिने उलटल्यानंतरही उत्तरपत्रिकेच्या तपासणीचे काम पूर्ण केले नाही. अद्यापही सुमारे ५ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी होणे बाकी आहे. परिणामी विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल ४५ दिवसांत लागणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. त्यातून विधीच्या या विद्यार्थ्यांचे पुढील सत्राच्या नियोजनावर परिणाम होणार आहे.
विधी शाखेच्या एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाच्या ५व्या सत्राची आणि बीएलएस अभ्यासक्रमाच्या नवव्या सत्राची परीक्षा गेल्यावर्षी २९ नोव्हेंबरला सुरू होऊन ७ डिसेंबरला संपली होती. या परीक्षेचा निकाल पुढील ४५ दिवसांत म्हणजेच जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लागणे अपेक्षित होते. मात्र आता २१ फेब्रुवारी उलटल्यानंतरही अद्याप निकाल लागलेला नाही. त्यातच अजूनही सुमारे ५ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी होणे बाकी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. परिणामी निकालाला विलंब होणार असून त्याचा फटका पुढील सत्रांवर होणार आहे.
अनेक महाविद्यालयांमधून उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रलंबित आहे. त्यातून निकालाला विलंब होत असल्याचा दावा विद्यापीठाकडून केला जात आहे. मात्र यावर विधीच्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
विद्यापीठाने वेळेत निकाल लावावेत, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. ‘डिसेंबरमध्ये पार पडलेल्या परीक्षेचा निकाल अद्याप लागला नाही. अजूनही मोठ्या संख्येने उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहे. विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे निकाल लांबणीवर पडले आहेत हे दुर्दैवी आहे. विद्यापीठाने लवकरात लवकर निकाल लावावेत,’ अशी मागणी युवा सेना (शिंदे गट) सचिन पवार यांनी केली आहे.
पेपर तपासण्याचे निर्देश
‘विधी महाविद्यालयांतील शिक्षक या उत्तरपत्रिकांची तपासणी करतात. विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना जलदगतीने उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाकडून निकाल जाहीर केले जातील,’ असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.