बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. नियामकांची बैठकही होत नसल्याने तपासणीकांसाठीच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे पाकिटे शिक्षण मंडळ कार्यालयात पडून आहेत. गुरुवारीही नियामकांची बैठक झाली नाही. आणि नियामकांनी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेचे पाकिट स्विकारले नाहीत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू आहेत. बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तपासणीची प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. प्रक्रिया २२ फेब्रुवारीपासून सुरू होणे अपेक्षित होते. परंतु तिसऱ्या दिवशीही नियामकांनी त्यांना मिळणाऱ्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे पाकिटे स्विकारली नाहीत.
इंग्रजी विषयाचे औरंगाबाद विभागात १७० नियामक आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे पदाधिकारी गुरुवारी मंडळ कार्यालयासमोर जमा झाले. बहिष्कार असल्याने बैठक घेण्यात येणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. इंग्रजी विषयाचे नियामकांपैकी विभागातील २० नियामक हजर होते व सर्वांनी मिळून पेपर तपासणीवर बहिष्कार असल्याचे निवेदन विभागीय सचिव विजय जोशी यांना दिले. शहरातील
देवगिरी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, सरस्वती भुवन महाविद्यालय, मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर, देवगाव रंगारी कनिष्ठ महाविद्यालय येथील प्राध्यापकांचा आंदोलनात भाग घेतला व मंडळाच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. या वेळी प्रा. रवींद्र पाटील, डॉ. भारत खैरनार, प्रा. संजय गायकवाड, प्रा. एस. एम. गांगर्डे, प्रा. चंपालाल कहाटे, राकेश खैरनार, प्रा. निखिल सहस्रबुद्धे, प्रा. गोविंद शिंदे, डॉ. नामदेव भागिले, प्रा. महेश नरवडे, प्रा. राजेंद्र पगारे, प्रा. प्रदीप धूतमोगरे यांची उपस्थिती होती.
तपासणीची प्रक्रिया प्रलंबितच
पेपर झाल्यानंतर संबंधित विषयांच्या मुख्य नियामकांची बैठक यानंतर विभागीय पातळीवर संबंधित विषयाच्या विभागीय नियामकांची बैठक होते. नियामकांच्या बैठकीत संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिकेबाबत त्रुटीची चर्चा होते. तपासणीच्या प्रक्रियेचे नियोजन होते. प्रत्येक नियामकाकडे सहा ते सात उत्तरपत्रिका तपासनीस शिक्षक असतात. त्यांना देण्यात येणारी प्रश्नपत्रिका, आदर्श उत्तरपत्रिकेसह तपासणीसाठी उत्तरपत्रिकांचे विेतरणाबाबत निश्चिती होते. त्यानंतर तपासणीची प्रक्रिया सुरू होते. नियामकांची बैठकही होत नसल्याने तपासणीकांसाठीच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे पाकिटे शिक्षण मंडळ कार्यालयात पडून आहेत.
उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. हिंदीच्या मुख्य नियामकांची बैठक झाली नाही. त्यासह विभागीय पातळीवरही शुक्रवारी होणाऱ्या बैठकीवरही आमचा बहिष्कार असेल.
प्रा. सी. एम. कहाटे, मुख्य नियामक, हिंदी.