‘मेट्रो २ ब’ ही मार्गिका अंधेरी पूर्वेकडील ईएसआयसी कॉलनी ते मानखुर्द येथील मंडालापर्यंत आहे. वांद्रे, बीकेसी, कुर्ला, पूर्व द्रुतगती मार्ग, चेंबूर, मानखुर्दमार्गे मंडालापर्यंत जाणार आहे. २३ किमीच्या या मार्गिकेतील पहिला टप्पा कुर्ला ते मंडाला, असा असेल. त्यासाठीची तयारी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने सुरू केली आहे. त्याअंतर्गत ही मेट्रो चालविण्यासाठी चालक पुरविण्यासंबंधी प्राधिकरणाने निविदा काढली आहे.
या निविदेनुसार, संबंधित कंत्राटदाराला चालक पुरविण्यासह एकूणच मेट्रो कार्यान्वयन हाताळायचे आहे. त्याअंतर्गत चालकांना प्रशिक्षित करण्यासाठी या मेट्रो रेल्वेच्या कार्यान्वयनासाठी अन्य कर्मचारीही नेमायचे आहेत. त्याअंतर्गत एकूण १२० चालक, सहा क्रू ऑपरेटर्स, पाच ट्रेन ऑपरेशन व्यवस्थापकांचा समावेश असेल.
तेवढे मनुष्यबळ संबंधित कंत्राटदाराला पुरविणे आवश्यक असेल. तसेच या सर्वांना प्रशिक्षित करण्यासह एकूणच मेट्रो मार्गिकेची सक्षमपणे हाताळणी करणे, पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत सेवा अखंड सुरू राहण्याबाबत संरचना उभी करणे, सुरक्षेची काळजी घेणे आदी कामे कंत्राटदाराला करायची आहेत. यासाठीचा खर्च ४५ कोटी २७ लाख ०३ हजार ८५२ इतका असेल. पाच वर्षांसाठी हे कंत्राट असेल. निविदा भरण्याची अखेरची तारिख २७ मार्च असेल.
‘मेट्रो २ बी’च्या रेल्वेगाड्या अद्याप ही मार्गिका विकसित करणाऱ्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कंपनी लिमिटेडच्या (एमएमआरडीएची विशेष कंपनी) ताफ्यात आलेल्या नाहीत. त्या गाड्या ताफ्यात आल्यावर त्यांची चाचणी घेतली जाणार आहे. यासाठीच गाड्या ताफ्यात येईपर्यंत चालक सज्ज असावेत, या हेतूने ही निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसार या चालकांना सध्याच्या मार्गिकेवरच प्रशिक्षित केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
… असा असेल पगार
प्रकार- पगार
चालक- २२ हजार रू.
क्रू नियंत्रक- ३० हजार रू.
ट्रेन ऑपरेटर व्यवस्थापक- ४० हजार रू.
(याखेरीज रात्रपाळी भत्ता आठ तासांचे २५० रू (रात्री ८ ते सकाळी ६), गाडी धाव भत्ता १ रुपया प्रति किमी, ओव्हरटाइम २५० रू प्रति तास, अन्य भत्ते ५०० रुपये प्रति अन्य कामदेखील देणे कंत्राटदाराने देणे अनिवार्य असणार आहे.)