प्रमोद चौगुले याचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्याला लहानपणापासून घरी आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे प्रमोदच्या वडिलांना अनेक दिवस टेम्पोचालक म्हणून काम करावे लागले होते. अशा खडतर असलेल्या परिस्थितीतही इंजिनीअर होऊन, राज्य सेवा परीक्षेच्या निकालात राज्यात पहिला येण्याचा मान त्याने मिळविला.
मिरज तालुक्यातील सोनी गावातील प्रमोद चौगुलेने हा कारनामा सलग दुसऱ्यांदा केल्याने राज्यातून त्याचे विशेष कौतुक होत आहे. आता प्रमोद विवाहित असून, त्याच्या परिवारात एक लहान मुलगी आहे. त्याची पत्नी गृहिणी आहे.
यश १ गुणाने हुकले
प्रमोदने सुरुवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षा दिल्या. मात्र, त्यात त्याला यश मिळाले नाही. यानंतर त्याने राज्यसेवेकडे मोर्चा वळवला. २०१९मध्ये पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत मजल मारली. केवळ एका गुणामुळे तो गुणवत्ता यादीत येऊ शकले नाहीत. पण या आव्हानाने न खचता त्याने पुन्हा एकदा तयारी सुरू केली.
पूर परिस्थिती आणि करोनाकाळात अभ्यास करून राज्यसेवा परीक्षेच्या २०२०च्या निकालात प्रमोद प्रथम आला. मात्र, पोलिस उपअधीक्षक आणि उपजिल्हाधिकारी ही पदे तेव्हा उपलब्ध नसल्याने, त्याने परत तयारी करून राज्यसेवा २०२१ परीक्षा दिली. सध्या प्रमोद उद्योग विभागात उपसंचालक (प्रोबेशनरी) म्हणून कार्यरत आहेत.