वेगाने विस्तारणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाल्याने निम्म्या जागा रिक्त आहेत. तर अनेक अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविताना उपलब्ध यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. पालिका प्रशासनाकडून प्रशासकीय व तांत्रिक कामकाजासाठी पदनिर्मिती करताना १९९५ मध्ये मोठ्या प्रमाणावर मेगाभरती केली होती.
नंतर वेळोवेळी टप्प्याटप्प्याने नोकरभरती करण्यात आली होती. शेवटच्या टप्प्यात २०१२ मध्ये पालिकेत नोकरभरती झाली होती. त्यानंतर मागील १० वर्षांत भरती झालेली नसून या काळात अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याने या जागा रिक्त आहेत. म्हणूनच पालिकेतील रिक्त पदांसाठी शासनाने नोकरभरतीला मान्यता द्यावी यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधी व तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
शासनाकडून ६६७८ कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधास मान्यता मिळाल्याने नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या पालिकेत वेगवेगळ्या विभागांत ४१३७ कर्मचारी कार्यरत असून २५४७ पदे रिक्त आहेत. शासन निर्णयानुसार आस्थापना खर्चाची मर्यादा उत्पन्नाच्या ३५ टक्के निश्चित करण्यात आली आहे, मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका आस्थापनाचा खर्च ४५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी मोठा हिस्सा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होत असल्याने शासनाने पालिकेतील नोकरभरतीवर निर्बंध घातले होते.
आस्थापना खर्च आटोक्यात आणल्यानंतरच नोकरभरती केली जाईल, असा शासनाचा आदेश असल्याने पालिकेतील नोकरभरतीचा प्रश्न अधांतरी राहिला होता.
सरळ सेवा कोट्यातून भरती
शासनाच्या निर्देशानुसार पालिकेतील अत्यावश्यक असलेली एकूण १०४८ रिक्त पदे पालिकेच्या आकृतिबंधानुसार मंजूर सरळ सेवा कोट्यातून भरण्यास शासनाने हिरवा कंदील दिला आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी शासनाने नोकरभरती प्रक्रियेसाठी नेमलेल्या संस्थेकडून ऑनलाइन भरती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, महापलिकेने आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवत आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या मर्यादेमध्ये रहावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.
अशी भरणार पदे
आरोग्य विभाग- ५४२
अग्निशमन विभाग -२९२
अभियांत्रिकी विभाग -१५२
घनकचरा -४७
नगर रचना विभाग – १५