शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेला आज, बुधवारपासून (एक मार्च) सुरुवात होत आहे. त्यामुळे पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी १७ मार्चपर्यत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली.
‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले होते. प्रवेश प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुरू होणार होती. मात्र, प्रवेशासाठी मुलाचे आधार कार्ड स्वीकारण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. याबाबत सूचना प्राप्त झाल्यानंतर, ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लाभला आहे. प्रवेश प्रक्रियेत शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना एक मार्च ते १७ मार्च या कालावधीत अर्ज करायचे आहेत. आज दुपारी तीन वाजेनंतर पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती गोसावी यांनी दिली.
यंदाच्या ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत आठ हजार ८२७ शाळा असून, त्यातील एक लाख एक हजार ९२६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पालकांनी https://student.maharashtra.gov.in/ या लिंकचा वापर करावा. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कादगपत्रांची माहिती आणि इतर सविस्तर माहिती ‘आरटीई’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.
‘आरटीई’ पालक केंद्र सुरू
दुर्बल आणि वंचित घटकांमधील पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरतांना मदत व्हावी, यासाठी अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेतर्फे विनामूल्य मार्गदर्शन आणि मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार पालकांनी साने गुरुजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ, पर्वती पायथा या ठिकाणी आरटीई पालक केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहणार आहे. पालकांनी अधिक माहितीसाठी शरद जावडेकर (९८२३७५९५६८), सुरेखा खरे (९८८१०३६७८५) आणि सुनील भोसले (९६२३८९०२३१) यांना संपर्क साधावा.