म. टा. प्रतिनिधी, मुंबई
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारावर अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे बारावीच्या ५० लाख उत्तरपत्रिकांच्या तपासणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. हीच स्थिती कायम राहिल्यास बारावीच्या निकालास विलंब होण्याची शक्यता आहे.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. शिक्षकांच्या या मागण्यांबाबत शिक्षणमंत्री आणि संघटनांची बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीचे इतिवृत्त न मिळाल्याने शिक्षक बहिष्कारावर ठाम आहेत. सद्यस्थितीत बारावीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा विषयांसह वाणिज्य संघटन आणि भौतिकशास्त्र विषयाची परीक्षा पार पडली आहे. गेल्या सात दिवसांत या विषयांच्या सुमारे ५० लाख उत्तरपत्रिका महाविद्यालय आणि कस्टडी स्तरावर तपासणीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. मात्र मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत उत्तरपत्रिका स्वीकारण्यास शिक्षकांनी नकार दिला आहे.
‘शिक्षकांच्या बहिष्कारामुळे मुख्य नियामकांची बैठक होऊ शकलेली नाही. सोमवारी भौतिकशास्त्र विषयाच्या मुख्य नियामकांनी बहिष्कारात सहभागी असल्याचे निवेदन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांना दिले. तसेच अन्य विषयांच्या नियामकांनीही बहिष्काराची निवेदने मंडळाकडे दिली आहेत’, अशी माहिती महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी दिली.
अशा आहेत मागण्या
राज्यात सन २००५नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सरकारी कर्मचाऱ्यांची १०, २० आणि ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी, निवड श्रेणीसाठी २० टक्क्यांची अट रद्द करावी आदी मागण्या शिक्षकांनी लावून धरल्या आहेत. तसेच वाढीव पदांना रुजू दिनांकापासून मंजुरी द्यावी, अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, विनाअनुदानितकडून अनुदानितमधील बदलीला दिलेली स्थगिती रद्द करावी, अशा मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत.