शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मधील बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली. बारावीनंतर आज दोन मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. कोविडनंतर दोन वर्षांनी परीक्षा नियमित पद्धतीने होत आहेत.
दहावी परीक्षेची अंतिम तयारी विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयात सुरू होती. परिरक्षकांशी संपर्क साधत परीक्षेचे साहित्याबाबतही आढावा घेण्यात येत होता. प्रश्नपत्रिका परिरक्षक कार्यालयात पोहचल्या असून परिरक्षकांना काय खबरदारी घ्यावयाची आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.
गुरुवारी प्रथम भाषेच्या पेपरने परीक्षेला प्रारंभ होईल. यामध्ये, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती यांसह इतर बारा भाषांचा समावेश आहे. दुपारच्या सत्रात जर्मन आणि फ्रेंच या भाषांचे पेपर घेण्यात येतील.
परीक्षेसाठी मंडळाने यंदा जिल्हास्तरावर केंद्रप्रमुखांची, परीरक्षकांची बैठक घेत परीक्षेतील बैठक व्यवस्था, गैरप्रकारांना आळा याबाबत मार्गदर्शन केले. भरारी पथकांची नेमणूकही करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून बैठे पथकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. यंदा ऐनवेळी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. त्यामुळे अनेक केंद्रांना उपकेंद्रे देण्यात आली आहेत.
संबंधित केंद्रांच्या जवळ असलेली इतर शाळा, महाविद्यालय उपकेंद्र म्हणून देण्यात आले. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थेचे नियोजन करत असताना एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था असावी असे निर्देश देण्यात आले.