बेनो ही मूळची चेन्नईची आहे. जन्मानंतर तिची दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. अशा परिस्थितीत फक्त पालकच तिचा आधार ठरले. तिला कुठे जायचे असल्यास तिचे वडील ल्यूक बेनो तिला घेऊन जायचे. तर आई तिला पुस्तके वाचून दाखवायची.
बेनोने तिचे शालेय शिक्षण लिटल फ्लोअर कॉन्व्हेंट हायर सेकेंडरी स्कूलमधून केले. तसेच स्टेला मॅरिस कॉलेजमधून तिने पदवी प्राप्त केली. त्याचवेळी तिने लोयजा कॉलेजमधून पीजीचे शिक्षण घेतले. यूपीएससी परीक्षेची तयारी करीत असताना आईने वर्तमानपत्र वाचून दाखविली आणि त्यावरुन बेनोने आपली तयारी सुरु ठेवली.
ब्रेल लिपीची मदत
बेनोला लहानपणापासूनच नागरी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न होते. ती जसजशी मोठी होत गेली, तसतशी तिने यूपीएससी नागरी सेवांचीही तयारी सुरू केली. यासाठी तिने ब्रेल लिपीचा अभ्यास केला आणि इंटरनेटचीही मदत घेतली. कारण तिला ज्या विषयाची तयारी करायची होती त्याचे ऑडिओही इंटरनेटवर उपलब्ध होते. यामुळेच तिला तयारी करण्यात कोणतीही अडचण आली नाही.
२०१३-१४ मध्ये झाली निवड
२०१३-१४ च्या नागरी सेवा परीक्षेत बेनोची निवड झाली होती. तिला ३४३ वा क्रमांक मिळाला. मात्र, डोळ्यांनी पाहता येत नसल्याने सुमारे दीड वर्ष तिचे जॉईनिंग होऊ शकले नाही. पण २०१५ मध्ये तिला परराष्ट्र मंत्रालयात नियुक्ती मिळाली. यासह, भारतीय सेवेत निवड होणारी ती पहिली दृष्टिहीन अधिकारी बनली आहे. यूपीएससीची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. त्यात दृष्टीबाधितांच्या वर्गातून तिने अव्वल येण्याचा मान मिळवून आई-वडिलांचे नाव उंचावले आहे.