शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या टोळीला दणका; पोलिसांनी असा केला पर्दाफाश

: सांगलीसह आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची जनावरे चोरून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या चोरट्यांना कुरळप पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक करून चोरीतील सहा गायी ताब्यात घेतल्या आहेत. सुरेश भिवा लोखंडे ( रा. जुजारपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि नितीन ऊर्फ सोन्या मारूती रास्कर (रा. इटकरे, ता. वाळवा, जि. सांगली) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत.

कुरळप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील शेतकरी तानाजी बंडू रासकर यांच्या शेतातील गोठ्यातून २३ जुलै रोजी तीन गायींची चोरी झाली होती. याबाबत त्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर कुरळप पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू झाला.

सांगली जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारे जनावरांच्या चोऱ्या करून त्यांची परस्पर विक्री केल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे कुरळप पोलिसांनी आसपासच्या जिल्ह्यांमध्ये संशयितांचा शोध सुरू केला. इटकरे येथील सोन्या रास्कर याने सांगोला तालुक्यातील एका साथीदारासह जनावरांची चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार रास्कर याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याचा साथीदार सुरेश लोखंडे याला अटक केली. या दोघांकडून चोरीतील सहा गायी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. याशिवाय आणखी चार गायी चोरून त्या विकल्याचा कबुली त्यांनी दिली आहे.

दरम्यान, चोरट्यांकडून ताब्यात घेतलेल्या सहा गायी सध्या करुळप पोलिस ठाण्याच्या आवारातच बांधल्या आहेत. पोलिसांकडून या गायींचा सांभाळ सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानंतर संबंधित शेतकऱ्यांनी ओळख पटवून गायींचा ताबा घ्यावा, असं आवाहन सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी केलं आहे.

Source link

sangali newssangali policeसांगलीसांगली क्राइम न्यूजसांगली न्यूज
Comments (0)
Add Comment