श्रद्धा कपूरचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी मुंबईत झाला. श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे एक अभिनेत्री तर वडील शक्ती कपूर हे देखील प्रसिद्ध अभिनेते आणि उद्योगपती आहेत. श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. श्रद्धा लहानपणापासून सिनेमात अभिनय करण्याचे स्वप्न पाहत असे. ती नेहमी घरातील कपड्यांमध्ये आरशासमोर सराव करत असे. अभिनय करण्यासाठी तिने शिक्षणालादेखील रामराम ठोकला होता.
श्रद्धा कपूरने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मुंबईतील अमेरिकन शाळेत प्रवेश घेतला. अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे तिचे वर्गमित्र होते. श्रद्धा कपूर सर्व डान्स प्रोग्राममध्ये सहभागी होत असे.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अॅडव्हर्टायझिंग स्ट्रीममध्ये पदवी मिळवण्यासाठी ती अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात गेली. पण अभिनय क्षेत्रातील आवडीवमुळे तिने ते शिक्षण अर्ध्यावरच सोडले.
श्रद्धा कपूरने २०१० मध्ये आलेल्या तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये तिने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने बेन किंग्सले, अमिताभ बच्चन आणि आर माधवन यांच्यासोबत काम केले होते. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी समीक्षकांनी तिच्या कामाचे कौतुक केले.
यानंतर श्रद्धा कपूर लव का द एंड या कॉमेडी चित्रपटात दिसली, ज्यामध्ये तिने एका शाळकरी मुलीची भूमिका केली होती. नंतर तिने आशिकी २ या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामानंतर प्रेक्षकांनी तिला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. आशिकी २ तील सर्वच गाणी चाहत्यांच्या तोंडपाठ झाली.