HSC Exam: गणिताचा पेपर पाहून घाम फुटला, लघुशंकेचं कारण सांगून बारावीचा विद्यार्थी उत्तरपत्रिकेसह पळाला

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

लघुशंकेला जाण्याचे कारण पुढे करून विद्यार्थी उत्तरपत्रिका घेवून पळून गेल्याची घटना नागसेन माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर शुक्रवारी (तीन मार्च) घडली. पर्यवेक्षिका आणि केंद्रप्रमुखांनी माहिती दिल्यावर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आणि एक ते दीड तासांनंतर तो विद्यार्थी एका अभ्यासिकेत सापडला. या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

बारावीचा गणित आणि संख्याशास्त्र या विषयाचा पेपर शुक्रवारी होता. सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजून दहा मिनिटांपर्यंत पेपरची वेळ होती. नागसेन माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील एका हॉलमधील एक विद्यार्थी पेपर संपण्यासाठी दहा मिनिटे बाकी असताना पर्यवेक्षकांकडे आला आणि लघूशंकेला जायचे आहे, असे सांगून बाहेर जाण्याची परवानगी मागू लागला अशी माहिती केंद्रप्रमुखांनी दिली.

‘पेपर सुटण्यासाठी दहाच मिनिटे बाकी आहेत. दहा मिनिटांनंतर जा,’ असे पर्यवेक्षिकेने त्या विद्यार्थ्याला सांगितले. तरीही, तो विद्यार्थी तसाच उभा राहिला आणि हॉलच्या बाहेर पळाला. विद्यार्थी पळाल्यावर पर्यवेक्षिकेने आरडाओरडा केला. त्यामुळे केंद्रप्रमुखांसह अन्य शिक्षकांनी वर्गात येऊन पाहणी केली.

विद्यार्थ्याच्या बाकावर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचे केवळ तेरा क्रमांकाचे पान होते.या घटनेबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली आणि वर्गातील विद्यार्थ्यांना पेपरची वेळ संपल्यावर थांबवून ठेवण्यात आले. पोलिसांनी अन्य विद्यार्थ्यांची चौकशी केली असता, हा विद्यार्थी सुरुवातीपासून तणावात होता, असे लक्षात आले. पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आणि एका अभ्यासिकेतून त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.

परीक्षा केंद्रातील बाथरुममध्ये पाणी नसल्यामुळे आपण पळून अभ्यासिकेत आलो, उत्तरपत्रिकेची पाने फाडली नाहीत असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर पाटील तपास करत आहेत.

पेपर संपण्यासाठी दहा मिनिटे शिल्लक असताना तो विद्यार्थी उत्तरपत्रिका घेऊन पळाला. विद्यालयाचे कर्मचारी त्या विद्यार्थ्याच्या मागे गेले; तोपर्यंत तो भिंतीवरून उडी मारून पळून गेला होता. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. शिक्षण मंडळाही माहिती देण्यात आली. मंडळाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही होईल.
– रवीराज चव्हाण, केंद्रप्रमुख, नागसेन माध्यमिक विद्यालय

उस्मानपुरा भागातील नागसेन माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रात परीक्षा देत असलेला एक विद्यार्थी उत्तरपत्रिका घेऊन पळाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग)

नियमानुसार कारवाई

लिहिलेली उत्तरपत्रिका बाहेर घेऊन जाणे किंवा बाहेरून उत्तरपत्रिका लिहून आणणे, एका विद्यार्थ्याऐवजी दुसऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा देणे, परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांबरोबर गैरव्यवहार करणे आदी प्रकरणी शिक्षासुची प्रमाणे संबंधित विद्यार्थ्याची संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द करून त्याला पुढील पाच परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करता येतो. तसेच, पोलिसांतही तक्रार नोंदवता येते, असे शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

Source link

12th answer sheetChatrapati SambhajinagarHSC AnswersheetHSC ExamHSC studentHSC Student run AwayMaharashtra Timesउत्तरपत्रिकेसह पळालाबारावीचा विद्यार्थीलघुशंकेचं कारण
Comments (0)
Add Comment