दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आसन व्यवस्थेचे नियोजन करताना अनेक शाळांची धांदल उडाली. शिक्षण विभागाने केंद्रांची केलेली तपासणी, उपकेंद्राचे नियोजन कागदापुरते होते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातीलच जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर चक्क संगणक प्रयोगशाळेच्या कक्षात विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा घ्यावी लागत आहे. परीक्षा केंद्रांमध्ये पत्राच्या वर्गखोली, खेळती हवा नसणे, पुरेसे पंखे नसणे अशा अनेक गैरसोयींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा गुरुवारपासून सुरु झाली. पहिला पेपर मराठी, उर्दू प्रथम भाषा विषयाचा झाला. सकाळच्या सत्रात १०.३० नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना आहेत. यामुळे विद्यार्थी सकाळी दहापासून परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह पालकांनीही केंद्रावर गर्दी केली होती.
शहरातील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची प्रवेशापूर्वी तपासणी करण्यात येत होती. परीक्षा कक्षात १०.३० वाजता विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. निर्धारित वेळेच्या अर्धातास आधी परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. कोविडनंतर नियमितपद्धतीने परीक्षा केंद्रावर दोन वर्षानंतर परीक्षा होत आहे.
ऑनलाइनमुळे दोन वर्ष कमी झालेला सराव, पहिल्यांदाच शिक्षण मंडळाच्या परीक्षेला सामोरे जात असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काहीशी चिंता होती. पालकही पाल्यांना काहीसा दिलासा देत होते. परीक्षा झाल्यानंतर आनंदात विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर पडत होते. पेपर सोपा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यातून दहावी परीक्षेला १ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ६२९ परीक्षा केंद्रावरून परीक्षा घेण्यात येत आहे.
दहावी परीक्षेत अनेक केंद्रावर विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गैरसोयीचा सामना करावा लागला. सोयीसुविधांबाबत दुर्लक्ष झाल्याचे चित्र होते. मुलांना सुविधा द्या असे सूचित करणाऱ्या शिक्षण मंडळाच्या सुचना, नियमावली केवळ चर्चे पुरती होती का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
छोटीशी वर्गखोली, संगणक प्रयोगशाळेची रूम, फॅनची अपुरी व्यवस्था, परिसरात अस्वच्छता, धुळ, परिसरातील बांधकामे अशा अनेक गैरसोयींचे चित्र काही केंद्रावर होते. शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत परीक्षा कक्षात संगणक एका बाजूला लावलेले आणि बाजूलाच विद्यार्थी परीक्षा देत आहेत, असे चित्र होते.