राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण घेण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार उच्च शिक्षणही मातृभाषेतून देण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ‘पीसीसीओई’ महाविद्यालयात एक तुकडी मराठीतून इंजिनीअरिंग करीत आहे.
इंजिनीअरिंग आणि डिप्लोमाची पुस्तके विद्यार्थ्यांना मराठीसह १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहेत. त्यासाठी ‘एआयसीटीई’ने ‘ई-कुंभ’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर इंजिनीअरिंग आणि डिप्लोमाची पुस्तके शाखेनुसार आहेत. सध्या इंजिनीअरिंग आणि डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांची पुस्तके मराठीत उपलब्ध झाली आहेत.
ई-कुंभवर सध्या कम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग, मेकॅनिकल, ईलेक्ट्रीकल, ईलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग अशा पाच शाखांमधील पुस्तके उपलब्ध आहेत. येत्या काही दिवसांत इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाची ४६, तर डिप्लोमाची ४४ पुस्तके प्रकाशित करण्याची ‘एआयसीटीई’ची योजना आहे. ही पुस्तके विद्यार्थी, प्राध्यापक आणि अभ्यासकांना मोफत नोंदणी करून डाउनलोड करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी https://ekumbh.aicte-india.org या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन ‘एआयसीटीई’ने केले आहे.
कॉपीराइटमुळे पुस्तकांना उशीर ?
सध्या ‘ई-कुंभ’ पोर्टलवरून उडिया भाषेतील पूर्ण पुस्तके डाउनलोड करता येतात. मात्र, मराठीसह इतर भाषांमधील पुस्तकांची फक्त अनुक्रमणिका आणि काही घटक दिले आहेत. ही पुस्तके छापून तयार असली तरी कॉपीराइटविषयक प्रश्नामुळे प्रकाशकांकडेच आहेत. ती विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध होण्यासाठी प्रकाशकांशी चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत पुस्तकाची पूर्ण पीडीएफ विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातील,’ अशी माहिती एआयसीटीईच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा