‘मराठी माध्यमांच्या शाळा बंद झाल्या असल्या तरी…’ पालिकेने दिले स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढत असल्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. पटसंख्येअभावी शाळा बंद न करता त्याच माध्यमाच्या नजिकच्या शाळेत विलीन केल्या जातात. त्यामुळे शाळा संख्या कमी झाली, तरी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्येची घसरण रोखण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून पालिका शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत. शाळांमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकरीतादेखील तयार केले जाते. या सर्व प्रयत्नांची फलश्रुती म्हणून सन २०२०-२१पासून मराठी शाळेतील विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे व शाळांची संख्यादेखील स्थिर आहे, असे पालिकेने म्हटले आहे. ‘मटा’ने शुक्रवारी Ḥ‘शाळांना घरघर, शिक्षकांची परवड’ प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर प्रशासनाने आपले स्पष्टीकरण दिले आहे.

सन २०२०-२१ मध्ये शाळांची संख्या २८३ व विद्यार्थी संख्या ही ३३,११४ होती. २०२१-२२ मध्ये शाळांची संख्या २७२ व विद्यार्थीसंख्या वाढून ३४,०१४ इतकी झाली. तर २०२२-२३ मध्ये शाळांची संख्या २७२ व विद्यार्थी संख्या ३४,०१४ एवढी वाढली. ही बाब लक्षात घेता पालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढती असल्याचे स्पष्ट होत आहे. शिक्षण हक्क कायद्यान्वये शिक्षकांची पदे विद्यार्थी पटसंख्येनुसार भरण्यात येतात. मराठी माध्यमांसाठी मंजूर शिक्षक पदे १ हजार २९९, तर कार्यरत पदे १ हजार ०७९‌ इतकी आहेत. तसेच रिक्त पदे ही २२० अर्थात १७ टक्के इतकी आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

Source link

bmc marathi schoolbmc schoolmarathi schoolMarathi School Closedमराठी माध्यमांच्या शाळामराठी शाळामराठी शाळा पटसंख्यामराठी शाळा बंद
Comments (0)
Add Comment