शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे ‘होळी.’ देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते.
होळी सणामागील उद्देश
दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच.
होळीची कहाणी
जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.