राज यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘नाशिकमध्ये आमची भेट झाली होती. मुंबईत कधी तरी पुन्हा भेटू असं राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. त्यानुसार आम्ही भेटलो. ही भेट युतीच्या चर्चेसाठी नव्हती. भूमिकेच्या चर्चेसाठी होती. दोन राजकीय नेते जेव्हा चहा प्यायला भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा होतेच, पण भाजप-मनसे युतीचा कुठलाही प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांच्या भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.’
वाचा: लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांना दंड
‘प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, यावर माझा विश्वास आहे. नाशिकला आम्ही दोघेही जात असतो, पण अपघातानं आमची भेट झाली. राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे, असं आम्ही नेहमी म्हणत होतो. पण समोरासमोर आम्ही नाशिकमध्ये आलो. आजही भेटही तशीच होती. आम्ही दोघांच्या मनातले मुद्दे उपस्थित केले. त्यांनी भूमिपुत्रांविषयीची त्यांची भूमिका मांडली. मी माझं मत मांडलं. मराठी माणसाच्या नोकऱ्यांबद्दलचा आग्रह ठीक आहे, पण त्या आग्रहामध्ये कटुता असल्याचं आमचं मत आहे. पण त्यांनी ते नाकारलं. आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही असं त्यांनी सांगितल्याचं पाटील म्हणाले. ‘राज ठाकरे यांच्याबद्दल, मनसेबद्दल जो एक समज आहे, तो बदलला पाहिजे. परप्रांतीयांनी मुंबईत येऊन मोठं होण्यास आमचा विरोध नाही हे त्यांनी जोरात मांडलं पाहिजे, असं आम्ही त्यांना सांगितल्याचं पाटील म्हणाले.
वाचा: संतापाचा भडका! लोकल ट्रेनसाठी मुंबई, ठाण्यात आंदोलन