शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशांसाठी आतापर्यंत एक लाख ३८ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेशप्रक्रियेत अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ मार्च असल्याने, अर्जसंख्या अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील अनेक पालकांसमोर अर्ज करताना तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत. त्यामुळे त्यांना अर्ज सादर करता येत नसल्याचे पालकांनी सांगितले.
‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेत राज्यातील आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. त्यानुसार यंदाच्या ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेत आठ हजार ८२७ शाळांनी नोंदणी केली आहे. त्यात एक लाख एक हजार ९२६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया एक मार्चपासून सुरू करण्यात आली. त्यात आतापर्यंत एक लाख ३८ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाल्याचे ‘आरटीई’ वेबसाइटवरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या प्रवेशप्रक्रियेत दोन लाख ८२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे १७ मार्चपर्यंत अर्जांमध्ये वाढ होणार आहे. ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया, जिल्हानिहाय शाळा, उपलब्ध जागा, अर्ज प्रक्रिया आदी माहिती https://www.student.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करण्यात अडचणी
‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेत मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी पालकांकडून गर्दी होत असते. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांत सर्व्हर हँग होणे, साइट संथगतीने चालणे, तांत्रिक अडचणी निर्माण होण्यासारखे प्रकार घडतात. मात्र, प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन आठवडा झाला, तरी अनेक पालकांना अर्जच करता येत नसल्याचे चित्र आहे. प्रवेशाचा अर्ज भरण्यापूर्वी, पालकांना ‘लॉग इन आयडी’ तयार करावा लागतो. त्यासाठी नोंदणीची प्रक्रिया करावी लागते. मात्र, ही प्रक्रिया करताना अडचणी येत आहेत. पालकांनी भरलेली माहिती ‘सेव्ह’ होत नसल्याचे काही पालकांनी सांगितले. त्यामुळे अर्ज भरता येत नसल्याचे चित्र आहे.