शिक्षणासाठी कॉलेजमध्ये जाताना सुरक्षारक्षक नेहमी माझ्यासोबत असायचे. त्यामुळे कॉलेजमध्ये इतर विद्यार्थी उत्सुकतेने पाहायचे. त्यावेळी मी सुरक्षारक्षकांना इमारतीखाली थांबायला सांगायचे. दरम्यान इतर विद्यार्थी माझ्याशी बोलायला यायचे. एकदा बोलणं झाली ही आपल्यातलीच आहे असे म्हणत लवकर मैत्री व्हायची अशी आठवण पंकजा मुंडे यांनी सांगितली.
कॉलेजच्या वेळचा रॅगिंगचा अनुभवही त्यांनी सांगितला. एके दिवशी कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांच्या ग्रुपने पंकजा मुंडे यांची रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला. वर्गात गरम होतंय असं सागूंन त्यांना पंखा सुरु करायला सांगितला. नंतर जास्त हवा लागतेय सांगून पंखा बंद करायला सांगितला. त्यावेळी पंकजा मुंडे यांची राजकीय पार्श्वभूमी उपस्थित विद्यार्थ्यांना कदाचित माहिती नव्हती.
मी नवीन आहे म्हणून माझी रॅगिंग होतेय हे लक्षात आलं होतं. पण तेवढ्यातच उपस्थित एका विद्यार्थ्याने माफी मागायला सुरुवात केली आणि उपस्थित सर्वांची धांदल उडाली. तू गृहमंत्र्यांची मुलगी आहेस, कृपया आमच्यावर रागवू नकोस, अशी विनवणी ते करु लागल्याचा किस्सा पंकजा मुंडे यांनी सांगितला.
यावेळी त्यांनी बाबांसोबतच्या आठवणींनादेखील उजाळा दिला. बाबा कधी मला शाळा किंवा कॉलेजला सोडायला आले नव्हते. त्यावेळी शाळांमध्ये पालकांना बोलविण्याचा प्रकार फारसा होत नसे. प्रीतमसाठी ते एकदा शाळेत आले होते. तसेच माझ्या मुलांच्या शाळेत ‘नाना-नानी डे’ असताना गोपीनाथ मुंडे उपस्थित राहिल्याची आठवण त्यांनी सांगितली. वर्षातून दोनवेळा बाबा आम्हाला फिरायला न्यायचे. कुटुंबासाठी वेळ काढायचे अशी आठवण त्यांनी सांगितली.
आपण आपल्या समाजाकडे पाहतो तेव्हा आपण अजून या मुलांसाठी काही केलं नाही असे वाटत राहते. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आणखी बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाचा अधिकार त्यांना मिळायला हवे, हा अधिकार त्यांना सहज उपलब्ध झाला तर त्यांचे आयुष्य घडेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.