PMC Job: पुणे महापालिकेत विविध जागांसाठी भरती सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेने ३२० जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू केली असून, वर्ग एकसाठी आठ, वर्ग दोनसाठी २३, तर वर्ग तीनसाठी २८९ जागांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांना २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. यात क्ष-किरण तज्ज्ञ (२०), वैद्यकीय अधिकारी (२०), उपसंचालक (०१) (प्राणी संग्रहालय, उपउद्यान अधीक्षक), पशुवैद्यकीय अधिकारी (०२), वरिष्ठ आरोग्य अधिकारी (२०), आरोग्य निरीक्षक (४०), कनिष्ठ अभियंता (१०), वाहन निरीक्षक (०३), औषध निर्माता (१५) आणि फायरमन (२००) या जागांसाठी ही भरती होणार आहे.

अशी होणार परीक्षा

महापालिकेने आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेतील भरती प्रक्रिया प्रसिद्ध केली असून, तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याचा कालावधी आठ ते २८ मार्च असा आहे. इच्छुक उमेदवारांनी https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर २८ मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे.

या जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत आणि इतर आवश्यक अटी व शर्ती अर्ज करण्याच्या लिंकवर उपलब्ध आहेत.

महापालिकेतील दुसरी भरती

पुणे महापालिकेत अनेक वर्षांहून अधिक काळ पदभरती झाली नव्हती. अपुऱ्या मनुष्यबळावर कारभार सुरू असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढले असून, त्यावरील खर्चही वाढला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कायम सेवा भरतीवरील बंदी उठविल्याने अत्यावश्यक पदभरती पहिल्या टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तो यशस्वीरीत्या झाला. यात पुणे महापालिकेने बऱ्याच वर्षांनी ४४८ पदांची भरती केली. त्यानंतर आता विविध पदांसाठी ३२० जणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘आयबीपीएस’ करणार भरती

महापालिकेने २० जुलैपासून ४४८ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यात सहायक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण निरीक्षक या पदांसाठी ही भरती करण्यात आली. भरतीची प्रक्रिया पारदर्शी असावी, यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (आयबीपीएस) या संस्थेद्वारे परीक्षा घेण्यासाठी करार केला होता. कुठल्याही आरोप-प्रत्यारोपाविना भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. पुणे महापालिकेने राज्यात यशस्वीरीत्या भरती प्रक्रिया पार पाडली आहे. नव्याने होणारी भरती प्रक्रिया याच संस्थेकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Source link

JobMaharashtra TimesPMC JobPMC RecruitmentPune Municipal CorporationrecruitmentVacancyपुणे महापालिका
Comments (0)
Add Comment