SSC Exam: दहावी वेळापत्रकात तारखांबाबत संभ्रम, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची धांदल

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात हिंदीनंतर इंग्रजी विषयाच्या पेपरचा उल्लेख आहे. आठ जूनला हिंदी विषयाचा पेपर झाल्यानंतर सहा जूनला इंग्रजी असा उल्लेख वेळापत्रकात आहे. शिक्षण मंडळाने प्रथम, द्वितीय, तृतीय भाषेनुसार वेळापत्रकाची संरचना केल्याचे अधिकारी सूत्रांचे म्हणणे आहे, परंतु त्याची कल्पना मंडळाकडून देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांची अनेक केंद्रावर धांदल उडाल्याचे चित्र होते.

माध्यमिक व उच्च माध्यिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारीपासून बारावीची तर, दोन मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू आहे. शिक्षण मंडळाची दहावी, बारावीची परीक्षा पहिल्या दिवशीपासून चर्चेत आहे. बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. उर्दू विषयाच्या प्रश्नपत्रिकेतही छपाईच्या चुका असल्याचे शिक्षकांचे म्हणणे होते.

आता दहावीच्या हॉलतिकीटात तारखांचा गोंधळ पहायला मिळतो आहे. आठ मार्चला हिंदी विषयाचा पेपर दाखविण्यात आला. त्यानंतर सहा मार्चचा इंग्रजी विषयाचा पेपर असल्याचा उल्लेख आहे. याबाबत अनेक विद्यार्थी, पालक मुख्याध्यापकांशी संपर्क साधत विचारणा करत होते. मंगळवारी धुलिवंदनाची सुट्टी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे बुधवारी काही विद्यार्थी हिंदी पेपरला उशिराने आले.

शहरातील अनेक केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर पंधरा, वीस मिनिटे आलेल्या विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेत, प्रवेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत मंडळातील अधिकारी सूत्रांनी सांगितले की, भाषेच्या क्रमानुसार वेळापत्रकाची तारीख दर्शविण्यात आली आहे. मराठी माध्यमातील मुलांची प्रथम भाषा मराठी असते. द्वितीय हिंदी आणि तृतीय भाषा इंग्रजी आहे. त्यामुळे त्यानुसार वेळापत्रकात तारखा दर्शविण्यात आल्या.

वेळापत्रक ऑनलाइन तयार होते. वेळापत्रकात भाषेच्या पेपरच्या तारखांबाबत काही जणांकडून विचारणा झाली होती. वेळापत्रकाची संरचना भाषा विषयाच्या प्रथम, द्वितीय, तृतीय भाषेप्रमाणे झाली असल्याचे दिसते. शाळांनाही आम्ही वारंवार सूचना करतो की, मंडळाने दिलेले अधिकृत वेळापत्रक विद्यार्थ्यांना सांगा, लिहून द्या. शाळाही त्याचे पालन करतात.
-विजय जोशी,विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर

विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमाप्रमाणे निर्धारित वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. एखाद्या कारणासाठी जर काही मिनिट विद्यार्थ्यांना उशीर झाला तर त्यांच्याकडून हमीपत्र घेत परीक्षेला बसण्याची परवानगी केंद्रप्रमुख देवू शकतो. याबाबतचे अधिकार केंद्रप्रमुखाला आहेत.
एम. के. देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

Source link

10th exam10th time table12th ExamHSC ExamMaharashtra boardSSC ExamSSC Exam ConfusionSSC HSC Examएकाच दिवशी दोन पेपरदहावी वेळापत्रकात तारखांबाबत संभ्रमविद्यार्थ्यांची होणार धावाधाव
Comments (0)
Add Comment