पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर
शिक्षण विभाग २०२३-२४ शैक्षणिक वर्षातही शाळापूर्व तयारी अभियान राबविणार आहे. पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी हे पाऊल यंदाही महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी शाळानिहाय माता पालक गट तयार करण्याबाबत शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू आहेत.

कोविडमुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण सुरू होते, परंतु अनेक विद्यार्थ्यांपासून हे शिक्षण दूर राहिले. त्यामुळे गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याचे लक्षात आले. यानंतर मागील वर्षी शाळापूर्व तयारी अभियान शिक्षण विभागाने राबिवले. प्रत्येक शाळांतर्गत माता पालक गट तयार करून पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरातूनच तयारी करून घेण्यात आली.

अभियानाचे परिणाम लक्षात घेत येत्या शैक्षणिक वर्षातही हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. शिक्षण विभागाने त्या दृष्टीकोनातून तयारी सुरू केली आहे. सरकारी शाळानिहाय माता पालक गट तयार करणे, अभ्यासक्रम, मूल्यमापन प्रक्रिया अशा बाबींवर विचारमंथन सुरू आहे. आराखडा तयार झाल्यानंतर पूर्वतयारीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून प्रक्रियेची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

इयत्ता पहिलीला दखलपात्र बालकांची शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच स्वयंसेवक यांचे मदतीने शाळापूर्व तयारी करणे व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीच्या वर्गात बालकांचे सहज संक्रमण घडून येणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ज्या बालकांची शाळापूर्व तयारी चांगली झालेली असते. ती बालके औपचारिक वाचन, लेखन, गणन या मूलभूत क्षमता सहजगत्या प्राप्त करतात, असे आढळून आल्याचे सांगण्यात येते.

जिल्ह्यात तीस हजारांपेक्षा बालकांचा समावेश

मुलांमध्ये शाळा, शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी अभियानात विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचे मूल्यांकनही होते. २०२२-२३ शैक्षणिक वर्षात शाळापूर्व तयारी उपक्रमात जिल्ह्यात १२०० हून अधिक शाळांमधून ५ हजार १८२ माता पालक गट निश्चित करण्यात आले होते. याद्वारे ३३ हजाराहून अधिक मुलांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले.

यंदा सुरुवातीला पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात येईल. ज्यात प्रामुख्याने ३ हजार २३७ अंगणवाड्यांमधील २ लाख ६१ हजार ९४८ बालकांमधून जे पहिल्याच्या वर्गासाठी पात्र असतील त्यांची संख्या निश्चित करण्यात येत आहे. यानंतर माता-पालक मेळावा, माता मेळावा घेवून शिक्षणाविषयीची जनजागृती केली जाणार आहे. शिक्षकांना वर्गानुसार आणि वयानुसार शिकवण्याच्या कृतीपद्धतीवर माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Source link

1st standered studentsCareer Newseducation newsPre schoolPre school preparationपहिलीचे विद्यार्थीशाळापूर्व तयारी
Comments (0)
Add Comment