वडाळ्यात दहावीची बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांना पत्र्याच्या खोलीत द्यावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच खोल्यांमध्ये पुरेशी खेळती हवा नसल्याने त्रासात भर पडत असून तीन तास उकाड्यात बसून पेपर लिहावा लागत आहे. वडाळ्यातील श्री गणेश झोपडी सेवा मंडळाच्या श्री गणेश विद्यालयातील दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या केंद्रावर विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
वडाळ्यातील श्री गणेश विद्यालय ही शाळा झोपडपट्टी भागात भरते. या शाळेमध्ये दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर दहावीचे सुमारे १७० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या शाळेत एकूण सात खोल्यांमध्ये परीक्षा होत आहे. शाळेला लागूनच घरे आहेत. त्यामुळे शेजारील गोंगाट वर्गात ऐकायला येतो. त्यातच या शाळेत पायाभूत सुविधांची कमतरता असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
शाळेतील बाके तुलनेने छोटी असून त्यांना छिद्रे पडलेली आहेत. त्यातून पेपर लिहिताना विद्यार्थ्यांची गैरसोय होते. वर्ग खोल्यांमध्ये पंखे नाहीत. तसेच हवा पुरेशी खेळती नाही. त्यामुळे घामाच्या धारा वाहत असताना पेपर लिहावा लागतो. सिमेंटच्या पत्र्याच्या खोलीत तीन तास बसून पेपर लिहिणे शक्य नाही, अशी तक्रार द दादर पारसी युथस् असेंब्ली हायस्कूलने शिक्षण मंडळाकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळेला परीक्षा केंद्र देताना तेथे सर्व सुविधा असल्याची खातरजमा केली नसल्याचे दिसत आहे. शिक्षण मंडळाने तत्काळ या विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्र बदलून द्यावे, अशी मागणी युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांनी केली आहे.
दरम्यान सद्यस्थितीत परीक्षा सुरू असताना केंद्र बदलणे शक्य नाही. मात्र या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्र संचालक आणि विद्यालयाच्या प्रमुखांना दिल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली.