शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) स्वयंअर्थसहाय्यित (खासगी) शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम पूर्वीप्रमाणे १७ हजार ६७० रुपये करण्यात आली आहे. करोना कालावधीत शाळा बंद असल्याने, आरटीईतून प्रवेश घेणाऱ्या प्रति विद्यार्थी रक्कम आठ हजार रूपये करण्यात आली होती. या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम १७ हजार ६७० रुपये प्रति विद्यार्थी निश्चित करण्यात आली होती. करोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१मध्ये शाळा बंद असल्याने शुल्क प्रतिपूर्तीचा दर कमी करुन आठ हजार रुपये प्रति विद्यार्थी करण्यात आला होता. याबाबत ‘मटा’नेही वृत्ताद्वारे प्रकाश टाकला होता.
त्यानंतर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातही करोना प्रादुर्भाव कायम राहिल्याने शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम सुधारित करण्यात आली नाही. मात्र, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात शाळा नियमितपणे सुरू झाल्याने शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत असणाऱ्या शाळांना १७ हजार ६७० रुपये प्रति विद्यार्थी शुल्क प्रतिपूर्ती दिली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करताना काही बाबींची पडताळणी करावी लागणार आहे. त्यानुसार ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या शाळांनी पहिली ते आठवीच्या शुल्काचा तपशील सरल किंवा ‘आरटीई’च्या वेबसाइटवर जाहीर करणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल वेबसाइटवर नोंदवलेले असावे. केवळ आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरावी.
प्रत्यक्ष विद्यार्थीसंख्येपैकी केवळ २५ टक्के विद्यार्थ्यांची संख्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी ग्राह्य धरली जाईल, असे शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.