मुंबई विद्यापीठाकडून निकालास विलंब; विद्यार्थी संघटना आंदोलनाच्या तयारीत

म. टा. प्रतिनिधी, मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी, फार्मसी, विधी शाखेच्या परीक्षा संपून ६० दिवस होऊन गेल्यानंतरही निकाल लागलेले नाहीत. विद्यापीठाने पुढील तीन दिवसांत हे निकाल जाहीर न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने दिला आहे. तर निकाल लवकर लागावा, यासाठी युवासेनेने राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवले आहे.

विद्यापीठाकडून विविध विद्याशाखांच्या निकालाला वारंवार विलंब होत आहे. परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांत निकाल लागणे अपेक्षित असते. मात्र विधीच्या तिसऱ्या आणि पाचव्या वर्षाच्या अभ्यासक्रमाचे निकाल लागलेले नाहीत. बीए, फार्मसी, अभियांत्रिकी आणि विधी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना ६० दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे पुढील अभ्यासक्रमांचेही वेळापत्रक कोलमडल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

विद्यापीठाकडून एलएलएम सत्र २ची परीक्षा १० ते १८ जानेवारीदरम्यान घेण्यात आली होती. तिचा निकाल ३ मार्चपर्यंत लागणे अपेक्षित होते. मात्र अद्याप निकाल लागलेला नाही. या संदर्भात ‘विद्यापीठाने बी. एससी आणि बी. कॉमचे निकाल जाहीर केले आहेत. फार्मसीच्या अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणी सुरू आहे. तसेच बी. ए. आणि विधी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राच्या उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झाली आहे. लवकरच निकाल जाहीर केला जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

राज्यपालांना पत्र

‘निकालाला सातत्याने विलंब होत आहे. त्याला विद्यापीठातील परीक्षा विभागाचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे. एलएलएम सत्र २चा निकाल वेळेवर लावला जावा, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहले आहे,’ असे युवासेना उपसचिव सचिन पवार यांनी सांगितले.

विद्यापीठाचा सावळागोंधळ

‘सध्या विद्यापीठाचा कारभार प्रभारींकडे सोपवलेला असल्याने सावळा गोंधळ सुरू आहे. विद्यापीठाने पुढील तीन दिवसांत सर्व निकाल न लावल्यास अभाविपकडून आंदोलन करण्यात येईल’, असा इशारा अभाविपचे कोकण प्रदेश मंत्री अमित ढोमसे यांनी दिला.

अडचणींचा सामना

करोनामुळे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले आहे. अशातच निकालाला विलंब होत असल्याने अभ्यासाचे वेळापत्रक कोलमडत आहे. शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी इंटर्नशिप अथवा नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. मात्र निकाल वेळेवर लागत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

‘गेल्यावर्षी जूनमध्ये एलएलएम पहिल्या सत्राची परीक्षा झाली होती. त्याचा निकाल १० ऑक्टोबरला लागला होता. तर यंदा ४५ दिवस उलटून गेले आहेत, तरीही द्वितीय सत्राचा निकाल लागलेला नाही,’ अशी माहिती विद्यार्थी सतीश शेरखाने यांनी दिली.

Source link

Delays Resultmumbai universityMumbai University ExamMumbai University ResultStudents agitationStudents Organisationआंदोलनाची तयारीमुंबई विद्यापीठविद्यार्थी संघटना
Comments (0)
Add Comment