हायलाइट्स:
- चंद्रकांत पाटील- राज ठाकरे भेटीनंतर भाजप-मनसे युती होणार का, अशी चर्चा सुरू.
- या भेटीबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
- मनसे आणि भाजप जर एकत्र येत असतील तर आनंदच होईल- बाळा नांदगावकर.
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता भाजप-मनसे युती होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. या भेटीबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनसे आणि भाजप जर एकत्र येत असतील तर आनंदच होईल, असे वक्तव्य करत नांदगावकर यांनी भविष्यातील भाजप-मनसे युतीचे संकेतच दिले आहेत.
मनसे नेते बाळा नांदगावकर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर, तर अमित ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. मुंबईत देखील आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पक्षाचे काम करतोय ते त्यांच्या पक्षाचे काम करत आहेत. व्यक्तीगत पातळीवर काम सुरूच आहे. सर्वच पक्ष आपापल्या पक्षासाठी काम करत आहेत. मात्र भाजप आणि मनसे हे दोन पक्ष जर भविष्यात एकत्र येत असतील तर त्याचा आनंदच आहे, असे नांदगावकर पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- राज ठाकरेंसोबत भेटीचा योग कसा जुळून आला?; चंद्रकांत पाटलांनी सांगितला किस्सा
राजकारणात पुढचा विचार करून काही ठोकताळे बांधायचे असतात. या ठोकताळ्यांचा अंदाज हा प्रत्येक पक्षाला असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशाच ठोकताळ्यांचा विचार करूनच उद्धव ठाकरे यांच्यासोबत सरकार स्थापन केले. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची ही भेट म्हणजे अशाच प्रकारचा हा ठोकताळा आहे, त्यामुळे त्यानुसार काही घटना घडतील, असे विधान करत त्यांनी या दोन पक्षाची युती होण्याबाबतचे संकेत दिले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- भाजप-मनसे एकत्र येणार; राज भेटीनंतर चंद्रकांत पाटलांनी मांडली भूमिका
मनसे पुन्हा हिंदुत्वाची भूमिका घेणार का, असा प्रश्न या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नांदगावकर यांना विचारला. त्यावर बोलताना नांदगावकर म्हणाले की, हिंदुत्व हे राज ठाकरे यांच्या रक्तातच आहे. हे पाहता हिंदुत्ववादाचा भूमिका नव्याने घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही हिंदुत्व घेऊनच जात आहोत.
क्लिक करा आणि वाचा- ‘कोण अमृता फडणवीस?’; महापौर किशोरी पेडणेकर यांचे प्रत्युत्तर
राऊत यांनाही दिले प्रत्युत्तर
शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी मनसे आणि भाजपने एकदा आपली ताकद आजमावून पाहावी, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना बाळा नांदगावतर म्हणाले की, संजय राऊत यांनी एकदा निवडणूक लढवूनच दाखवावी.