नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांतील नर्सरीच्या वर्गासाठी २०२३-२४साठीच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडूसकर यांनी दिली. महापालिकेच्या वतीने सीवूड आणि बोनकोडे या दोन शाळांमध्ये एकूण २४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अर्ज भरण्यासाठी २५ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने पालकांमध्ये उत्साह आहे. नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे कोपरखैरणे, सेक्टर-११ आणि नेरूळ, सेक्टर-५० या ठिकाणी सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा चालू करण्यात आल्या आहेत. खासगी शाळांच्या नर्सरीच्या प्रवेश प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झाल्या असताना, पालिकेच्या या शाळांमध्ये मात्र अजून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती.
प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती. या शाळांमध्ये आता नर्सरी वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. हा प्रवेश पूर्णत: निःशुल्क असल्याने या सुविधेचा लाभ पालकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशासाठी पाल्याचे वय ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत तीन वर्षे असणे आवश्यक आहे.
प्रवेशासाठी पाल्याचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र,आधारकार्ड, वडिलांचा रहिवासी पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत. .. तर लॉटरी पद्धतीने प्रवेश प्रवेश अर्ज संबंधित शाळेत २५ मार्चपर्यंत सर्व कागदपत्रांसह भरून देता येणार आहेत. प्रवेशासाठी शाळेपासून एक किमी अंतरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धत अवलंबण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.