दी इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून अर्थात मे महिन्यापासून लागू होणार असल्याची माहिती आहे.
साधारणपणे सीए अभ्यासक्रम प्रत्येक दहा वर्षांनंतर बदलत असतो. परंतु, गेल्या काही वर्षांत वाणिज्य क्षेत्रातील बदल, अभ्यासक्रमाकडून असलेली अपेक्षा, वस्तू व सेवा कायदा (जीएसटी) आदींचा विचार करत हा अभ्यासक्रम पहिल्यांदा दहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच अवघ्या पाच वर्षांतच बदलविण्याचा निर्णय आयसीएआयने घेतला.
त्याअनुषंगाने नव्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. संपूर्ण देशात नवीन अभ्यासक्रमाबाबत चर्चा आहे. प्राप्त माहितीनुसार, नवीन अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पाहून तयार करण्यात आला आहे.
सध्याचे तंत्रज्ञान, जीएसटी या अनुषंगाने या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अगदी इंटरमिजिएट झालेला विद्यार्थीदेखील नोकरीस पात्र ठरू शकेल इतका परिपक्व अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सीएची परीक्षा कठीण असली तरी अभ्यासक्रम व्यावहारिक स्वरूपाचा असावा याबाबत आयसीएआय आग्रही आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
आर्टिकलशिपमध्ये बदल
देशातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून, स्थानिक परिसरात यशस्वी सीए होता यावे, या दृष्टीने आयसीएआय कार्यरत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने सीएची परीक्षा विद्यार्थ्यांना आर्टिकलशिप झाल्यानंतर सहा महिन्यांनी देता येणार आहे. या सहा महिन्यांत विद्यार्थ्याला तयारी करावी लागणार आहे. एखाद्याला स्वतःची प्रॅक्टीस करायची झाल्यास, त्याला तीन वर्षे आर्टिकलशिप करावी लागणार आहे. त्यानंतर एका वर्षाने परीक्षा देता येईल. मात्र, एखाद्या कंपनीत सीए म्हणून नोकरी करायची झाल्यास, दोन वर्षे आर्टिकलशिप ग्राह्य धरली जाणार आहे.
विषयांची संख्या कमी
इंटरमीडिएट आणि अंतिम परीक्षेत विषयांची संख्या कमी करण्यात येणार आहे. त्यातील काही विषय हे ई-लर्निंग पद्धतीने शिकविले जातील. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने, त्याची परीक्षा होईल. या बदलामुंळे अंतिम परीक्षेत दोन ग्रुपमध्ये प्रत्येकी चारऐवजी तीन विषय राहतील आहे. त्यामुळे एकूण सहा विषय असतील, अशी माहिती आहे.