MBA CET:एमबीए-सीईटी परीक्षेत तांत्रिक बिघाड, राज्यभरातील परीक्षार्थी गोंधळात

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) व्यवस्थापन संस्थांमध्ये प्रवेशासाठी होत असलेल्या ‘महा-एमबीए सीईटी-२०२३’मध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी ताटकळत बसावे लागले. सकाळी नऊ वाजता सुरु होणारे सत्र ११ वाजता तर दुपारच्या सत्रातील परीक्षा २.३० वाजता सुरु झाली. परीक्षेतील अडचणींमुळे संतापलेल्या पालकांनी अनेक केंद्राबाहेर नाराजी व्यक्त केली.

सीईटी सेलने २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘महा-एमबीए सीईटी २०२३’ घेतली जात आहे.

शनिवार २५ मार्चपासून परीक्षेला सुरुवात झाली. राज्यभरात १९१ केंद्रावर परीक्षा सुरु आहे. सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या दरम्यान ही परीक्षा घेतली जात आहे. २६ मार्च रोजी ही परीक्षा संपणार आहे. पहिल्याच दिवशी सिईटी परीक्षेत तांत्रिक बिघाडामुळे विविध केंद्रावरील विद्यार्थ्यांची फरफट झाली. ऑनलाइन परीक्षा घेण्याची खासगी कंपनीकडे जबाबदारी आहे.

सकाळी विद्यार्थी नोंदणी करत होते तर अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी होत नव्हती. एका विद्यार्थ्यांनी नोंदणी केली अन् पुढे प्रक्रिया सुरु होत नव्हती. काही विद्यार्थ्यांची नोंदणी दोन-दोन वेळा दिसून येत होती. तर काही विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया होत नव्हती. अशा तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन परीक्षा कशी द्यायची, वेळ वाया जात असल्याने विद्यार्थी, प्राध्यापक गोंधळात पडले.

परीक्षेसाठी कंपनीने नेमलेले समन्वयकांची धांदल उडाल्याचे सांगण्यात येते. समन्वयक बेंगरूळू येथे कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तांत्रिक बिघाड दुरूस्तीची प्रक्रिया करत होते असे प्राध्यापकांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना निश्चित वेळापत्रकानुसार परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ वाढवून देत त्यांची परीक्षा घेण्यात आली.

सकाळच्या सत्रातील अनेक विद्यार्थ्यांचा पेपर १० किंवा त्यानंतर सुरु झाला. दुपारचे सत्रातील परीक्षेची वेळ येईपर्यंत सकाळच्या सत्रातील परीक्षा सुरु होती. दुपारच्या सत्रातील पेपर २.३० किंवा त्यानंतर सुरु झाल्याचे सांगण्यात येते. विद्यार्थी आणि पालकांनी सीईटी सेलच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. पण त्यांना तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

३० हजार जागांसाठी सीईटी

राज्यात विविध विद्यापीठ अंतर्गत एमबीए अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची संख्या २६५ आहे. एमबीए महाविद्यालयातील ३० हजार १४७ जागांवर ‘महा-एमबीए सीईटी-२०२३’तून प्रवेश दिल्या जाणार आहेत. दोन दिवसात विविध परीक्षा केंद्राहून ऑनलाइन परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत आहे.

Source link

Disruption of studentsMaharashtra TimesMBAMBA CET ExamMBA ExamMBA Exam centerstechnical failureएमबीए-सीईटी
Comments (0)
Add Comment