‘महाज्योती’ संस्थेकडून ओबीसी, भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या महात्मा जोतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्तीचे (फेलोशिप) पैसे चार महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप मिळाले नाहीत. ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असल्याचा मोठा गाजावाजा सरकारने केला. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्तीचे पैसे मिळाले नसल्याची स्थिती आहेत. त्यातून संशोधनासाठी या विद्यार्थ्यांना उसनवारीने; तसेच इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या हालाखीत भर पडली आहे.
राज्य सरकारने ओबीसी, भटक्या विमुक्त प्रवर्गातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’च्या माध्यमातून २०२०-२१ वर्षापासून फेलोशिप सुरू केली. ‘महाज्योती’ने २०२२-२३ वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी मे महिन्यात जाहिरात दिली. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांची सप्टेंबर २०२२मध्ये यादी जाहीर करण्यात आली. डिसेंबर २०२२मध्ये पात्र ठरलेल्या १,२२६ विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला; तसेच नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचे निश्चित केले. मात्र आता मार्च उलटत आला, तरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा एकही रुपया मिळाला नाही. त्यातून संशोधक विद्यार्थ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
‘यापूर्वी मार्चमध्ये शिष्यवृत्ती मिळेल असे सांगण्यात आले होते. मात्र अजून मिळाली नाही. आता आणखी काही दिवस लागतील, असे अधिकारी सांगत आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी नोंदणी झाल्याच्या दिनांकापासून शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित होते. मात्र, या प्रक्रियेला विलंब झाला. आता नोव्हेंबर २०२२ पासून शिष्यवृत्तीचे दिली जाणार आहे. मात्र, तीही अजून देण्यात आली नाही,’ अशी माहिती महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचा अध्यक्ष आणि संशोधक विद्यार्थी बळीराम चव्हाण यांनी दिली.
याबाबत ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्याकडे विचारणा केली असता पुढील तीन आठवड्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल, असे त्यांनी सांगितले.