शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याचा आज, शनिवारी (२५ मार्च) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
‘आरटीई’अंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांचा खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर विनामूल्य प्रवेश होतो. येत्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील काही पालकांना तांत्रिक कारणास्तव अर्ज करता आले नाही.
त्याचप्रमाणे काही पालकांकडे कागदपत्रे नसल्याने, त्यांना वेळेत अर्ज भरता आले नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याला मुदतवाढ देण्याची मागणी पालक आणि संघटनांकडून देण्यात करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून अर्ज करण्याला २५ मार्चपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आज शनिवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.
‘आरटीई’तून अर्ज करण्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण ७० हजारांनी अर्जांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन संचालनालयाकडून करण्यात आले आहे. पालकांनी अधिक माहितीसाठी https://rte25admission.maharashtra.gov.in/ या लिंकला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘आरटीई’त राज्याची स्थिती
शाळा : ८८२८
जागा : १०१९६९
प्रवेश अर्ज : ३५३६७२