राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. त्यांची आई सोनिया गांधी देखील कॉंग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. राहुल गांधी हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू आहेत. त्यांचे आजोबा फिरोज गांधी हे गुजरातचे पारशी होते. राहुल हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पणतू आहेत. प्रियांका गांधी वाड्रा ही त्यांची धाकटी बहीण आहे.
राहुल गांधी यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील सेंट कोलंबस स्कूलमधून केले. त्यानंतर १९८१ ते १९८३ या काळात उत्तराखंडमधील डेहराडून येथील द दून स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. दरम्यान ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे वडील राजकारणात आले आणि पंतप्रधान झाले.
राहुल गांधींनी १९८९ मध्ये दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला पण पहिल्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ते हार्वर्ड विद्यापीठात गेले. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर राहुल गांधींना फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी पाठवण्यात आले होते. राहुल यांनी आपले पदवीचे शिक्षण येथे पूर्ण केले. येथे राहुल गांधी यांची खरी ओळख विद्यापीठातील अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांनाच होती.
गेल्या निवडणुकीसाठी नामांकनाच्या वेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी घोषित केले की त्यांनी १९९५ मध्ये ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज विद्यापीठातून विकासात्मक अभ्यासात एमफिल (मास्टर ऑफ फिलॉसॉफी) पदवी प्राप्त केली आहे.
ग्रॅज्युएशननंतर राहुल गांधी यांनी लंडनच्या मॉनिटर ग्रुपमध्ये साधारण ३ वर्षे काम केले. ही कंपनी मॅनेजमेंट गुरु मायकेल पोर्टर यांची सल्लागार संस्था होती. तिथेही ते सुरक्षेच्या कारणास्तव राऊल विंचीच्या नावाने काम करत असे.
त्यानंतर २०२२ मध्ये राहुल गांधी भारतात परतले आणि त्यांनी स्वतःची मुंबईतील बॅकॉप्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही तंत्रज्ञान सल्लागार कंपनी स्थापन केली. येथे ते फर्मच्या संचालकांपैकी एक होते.