विनायक चतुर्थी तिथी मुहूर्त
गणेश चतुर्थी,विनायक चतुर्थी,संकष्टी चतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पांना महत्वाचे स्थान देण्यात आले असल्याने त्यांना प्रसन्न करण्यासाठी चतुर्थीचे उपवास आणि त्यांच्या आवडत्या गोष्टींना विशेष प्राधान्य देण्यात येते. उदय तिथीनुसार २५ मार्च रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाईल.
चैत्र शुक्ल विनायक चतुर्थी तिथी प्रारंभ २४ मार्च २०२३ सायं ४ वाजून ५९ मिनिटांनी ते चैत्र शुक्ल चतुर्थी तिथी समाप्ती – २५ मार्च २०२३ सायं ४ वाजून २३ मिनिटे.
या शुभ योगात चतुर्थी
चैत्र महिन्यात विनायक चतुर्थीच्या दिवशी रवियोग तयार होत आहे. रवि योगामध्ये सूर्याचा प्रभाव अधिक असतो, त्यामुळे हा योग अत्यंत प्रभावी मानला जातो, यामध्ये सूर्याची पवित्र ऊर्जा भरपूर असल्याने या योगात केलेले कार्य अशुभाचा नाश करून शुभ फल देते. या दिवशी रवी योग सकाळी ६ वाजून २० मिनिटे ते दुपारी १ वाजून १९ मिनिटापर्यंत असेल.
विनायक चतुर्थी पूजाविधी
गणपती बाप्पा यांची आराधना करण्यासाठी हा विनायक चतुर्थीचा उपवास केला जातो. उपवास सोडतांना गणेशाची मूर्ती किंवा मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन मनोभावे पूजा करावी . पूजेवेळी गणपतीला टिळक करावे, लड्डू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आणि गणपती बाप्पाची आरती करावी. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते.
या गोष्टी करा
चैत्र शुक्ल पक्षाची चतुर्थी ही हिंदू नववर्ष विक्रम संवत २०८० ची पहिली विनायक चतुर्थी असेल. धनप्राप्तीसाठी या दिवशी गणपतीला दुर्वाची माळ अर्पण करा, असे सांगितले जाते. तसेच गणपती बाप्पाला तूप आणि गूळ अर्पण करा आणि पूजेनंतर हे तूप आणि गूळ गायीला खाऊ घाला. असे ५ विनायक चतुर्थीला करा. त्यामुळे आर्थिक संकट दूर होते, असे सांगितले जाते. या दिवशी रवी योगही आहे, अशावेळी सूर्याष्टकांचे पठण करावे. यामुळे बुद्धिमत्ता आणि शक्ती वाढेल.