वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी विनाअनुदानित शाळांत २५ टक्के जागा आरक्षित कोट्यातून शैक्षणिक हक्क कायद्यानुसार म्हणजे आरटीईनुसार मोफत प्रवेश देण्यात येतो. ही कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून १७ मार्च २०२३ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. पालकांची मागणी लक्षात घेता ही मुदत २५मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
खासगी विनाअनुदानित शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून २०२३-२४ करता मोफत प्रवेशासाठी ६,५६९ जागा उपलब्ध आहेत. मुंबई जिल्ह्यातील एकूण ३३६ पात्र शाळांमध्ये आरटीईनुसार या जागा आहेत. पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून १ मार्च ते १७ मार्च २०२३पर्यंत पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने केले होते. हा अर्ज शासनाच्या student.maharashtra.gov.in (www नाही) किंवा education.maharashtra.gov.in या संकेतस्थळांच्या मुख्य पृष्ठावर ‘विद्यार्थी’ या जोडणी अंतर्गत उपलब्ध आहे. हा अर्ज आरटीई पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावयाचा आहे.
आरटीई अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे ‘अपलोड’ करण्याची आवश्यकता नाही. पालकांना या प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून संपूर्ण मुंबई क्षेत्रात ८३ मार्गदर्शक मदत केंद्रांची निर्मितीही करण्यात आली आहे. या केंद्रांवर मोफत अर्ज भरण्याची सुविधाही आहे. जे पालक ऑनलाइन आणि मोबाईल अॅपद्वारे स्वतःहून अर्ज करु शकतात, त्यांना मदत केंद्रावर येण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. त्याचबरोबर प्रवेश अर्ज भरताना चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी आता २५ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.